आरक्षण संपुष्टात आणण्याची कोणात हिंमत नाही; तसा कुणी प्रयत्न केल्यास प्रसंगी बलिदानही देऊ- नितीशकुमार

0
801

पटाना, दि. १ (पीसीबी) – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा राग आळवला आहे. ‘एससी/एसटीचे आरक्षण संपुष्टात आणण्याची कोणात हिंमत नाही. तसे करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास प्रसंगी आरक्षणासाठी बलिदानही देऊ’, असा इशारा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिला.

गया येथे जेडीयूने आयोजित केलेल्या दलित-महादलित संमेलनाला संबोधित करताना नितीशकुमार यांनी हा इशारा दिला. सामाजिक न्यायासह विकास साधण्यास आम्ही बांधिल आहोत. न्यायासह विकास म्हणजे समाजातील प्रत्येक घटकांचा आणि परिसराचा विकास होय, असं सांगतानाच कोणतंही काम न करता आणि कोणत्याही विचारधारेशी बांधील न होता काही लोक राजकारणात येतात आणि बळ मिळताच दुरुपयोग करतात, अशी टीका नितीशकुमार यांनी केली.

काही लोकांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात तणाव निर्माण करायचा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली. त्यात आरक्षणाची तरतूद केली. संविधान सभेने संविधान स्वीकारले. आरक्षणच मिळाले नाही तर वंचित घटकातील लोक मुख्य प्रवाहात कसे येतील? असा सवालही त्यांनी केला. मागासवर्गीयांचा विकास नाही झाला तर राज्य आणि देशाचाही विकासही होऊ शकत नाही, असंही त्यांनी नमूद केले.