आरक्षण विरोधी मानसिकता सोडून द्या; मायावतींची संघावर टीका

0
387

लखनऊ, दि. १९ (पीसीबी) – आरक्षणाच्या मुद्द्यावरून बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ‘आरक्षण ही मानवतावादी संवैधानिक व्यवस्था आहे. तिच्यात फेरबदल करणे अयोग्य आणि अन्यायकारक ठरेल. त्यापेक्षा संघाने आपली आरक्षणविरोधी मानसिकता सोडून द्यावी,’ असा हल्ला मायावती यांनी चढवला आहे. तर दलित आणि मागासांचे आरक्षण रद्द करण्याचा संघाचा अजेंडाच भागवत यांनी बोलून दाखवल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. आरक्षण विरोधक आणि आरक्षण समर्थक यांच्यात चर्चा होऊन सामंजस्याचे वातावरण निर्माण झाले पाहिजे, असे भागवत म्हणाले होते. आरक्षणाच्या समर्थकांनी आरक्षण विरोधकांच्या हिताकडे लक्ष देऊन त्यावर बोलले पाहिजे. तर आरक्षण विरोधकांनी आरक्षण समर्थकांच्या हिताची बाजू घेऊन बोलले पाहिजे, असेही भागवत म्हणाले होते. तसेच आरक्षणावरील प्रत्येक चर्चा वादळी होत असते, असेही त्यांनी म्हटले होते.

भागवत यांच्या वक्तव्यानंतर मायावती यांनी ट्विटरवरून त्यांच्यावर टीका केली. आरक्षणावर मोकळ्या मनाने चर्चा करण्यात यावी असे संघाचे म्हणणे आहे. खरे तर अशा चर्चेची काहीच गरज नसून अशा चर्चांमुळे संशयाचंच वातावरण निर्माण होईल. आरक्षण ही मानवतावादी संवैधानिक व्यवस्था आहे. तिच्यात फेरफार करणे अयोग्य आणि अन्यायकारकच असेल, असे सांगतानाच संघाने आरक्षणविरोधी मानसिकता सोडून द्यावी, असे मायावतींनी म्हटले आहे.