Maharashtra

आरक्षण टिकवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या – प्रकाश आंबेडकर

By PCB Author

July 11, 2019

मुंबई, दि, ११ (पीसीबी) – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्व घटकांचे आरक्षण टिकवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या असे आवाहन केले आहे. प्रकाश आंबेडकर सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. देशभरात आरक्षणावरुन गोंधळ असल्याची टीका त्यांनी केली आहे.

ओबीसी आणि मराठा आरक्षण टिकवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्ता असे आवाहन करताना प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे की, “ओबीसींना आपले २७ टक्के आरक्षण संपुष्टात येईल अशी भीती वाटत आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मात्र ही भीती दूर करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा किंवा शिवसेना कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही”.

“ओबीसी आरक्षणाला ‘अ’ आणि मराठा आरक्षणाला ‘ब’ असा गट देत विभागणी केली असती तर तर ओबीसी आरक्षण जाईल अशी भीती निर्माण होणार नाही. ओबीसी आरक्षण शाबूत ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून देऊ”, असं प्रकास आंबेडकर यांनी म्हटलं आहे.