आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा; संभाजीराजेंचा संताप

0
792

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आणि आरक्षण न मिळाल्याने प्रवेशापासून वंचित राहिलेल्या उस्मानाबादच्या एका मराठा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. आरक्षण गेले खड्ड्यात!, पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवरून केली आहे.

आरक्षण गेलं खड्ड्यात ! पदवी पर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा. उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळालीतील अक्षय शहाजी देवकर या मुलाला ९४ टक्के गुण मिळून देखील त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता.  दहावीला ९४ टक्के गुण घेऊनही मराठा असल्यामुळे चांगल्या कॉलेजला अॅडमिशन मिळाले नाही. या घटनेचा दाखला देत छत्रपती संभाजीराजे यांनी पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करण्याची मागणी केली आहे.

उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने आपले आयुष्य संपवले आहे. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला ९४% गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता! भाषणात बोलताना देशहित समाजहिताच्या गोष्टी आपण करत असतो. परंतु वास्तवात आपले आचरण त्या प्रकारचे आहे का? की उगाच ‘मुह में राम, बगल में सूरी’ असा प्रकार चालू आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. नाहीतर आज एवढा हुशार बालक आत्महत्येला प्रवृत्त होतोच कसा? त्याच्या आयुष्याची तर खरी सुरुवात होती, असा संतप्त सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.