आरक्षणाबाबत आधीच विधान केल्याने मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार – विखे -पाटील

0
620

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर झालेला नाही, त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आता आंदोलन करू नका, १ डिसेंबरला जल्लोष करा, असे विधान करून त्यांनी सभागृहाचा निश्चितच हक्कभंग केलेला आहे. त्यामुळे येत्या अधिवेशनात आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात  हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील यांनी सांगितले.

सकल मराठा क्रांती मोर्चाने आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आजचा १६वा दिवस आहे.  विखे पाटील यांनी आज (शनिवार) उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, अहवाल सादर करण्यापूर्वीच मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी अहवालाबाबत माध्यमांना मुलाखती दिल्या. हा देखील सभागृहाचा हक्कभंग आहे. त्यांच्याविरोधातही हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाणार  आहे.

मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अद्याप  सभागृहात सादर  होण्याआधी मुख्यमंत्री   काही विधाने करत असतील, तसेच आयोगाचे सदस्य त्याबाबत काही विधाने करत असतील, तर निश्चितच हा सभागहाचा हक्कभंग आहे, असे सांगून राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत बेजबाबदारपणे वागत आहे, अशी टीका विखे- पाटील यांनी यावेळी केली.