आरक्षणाबाबत अमित शहांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून सल्ला घ्यावा; शरद पवारांचा टोला

0
1045

अलिबाग, दि. ६ (पीसीबी) – महाराष्ट्रात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा विधीमंडळात नुकताच पास झाला आहे. दरम्यान ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नसल्याचे विधान  भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले होते. यावर शहा यांनी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. पवार अलिबागमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यभरात ५८ मोर्चे काढल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा महाराष्ट्रातील भाजप सरकारने केला आहे. त्यानंतर धनगर आणि मुस्लिम समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी रान पेटविण्यास सुरूवात केली आहे. याकडे लक्ष वेधत आता धनगर आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे,  असे शरद पवार म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना पवारांनी  स्थानिक पातळीवरील समविचारी पक्षांच्या आघाड्या होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर निकाल लागल्यानंतर  देश पातळीवर सर्वांनी आघाडी करावी, असेही  पवार म्हणाले आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या तोंडावर  राम मंदिराचा मुद्दा समोर आणला जात आहे, अशी टीका त्यांनी शिवसेना आणि भाजपवर नांव न घेता केली.