Maharashtra

आरक्षणाबाबतच्या पुढील सुनावणीपर्यंत मराठा तरुणांचं काय?; संभाजीराजे भोसले यांनी उपस्थित केला सवाल

By PCB Author

December 09, 2020

मुंबई, दि.९ (पीसीबी) : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. मात्र, पाच सदस्यीय घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला. त्यामुळे राज्य सरकारच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. जानेवारी महिन्यात या याचिकेवर सुनावणी होणार असून मात्र, आजच्या निर्णयावरून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी काही प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

संभाजीराजे म्हणाले कि, “माझी सरकारला विनंती आहे, मुलांचं फार नुकसान होतंय. मुलांमध्ये आक्रोश निर्माण होतोय. त्यांना पुढे काय करायचं कळत नाहीये. तोपर्यंत इतर माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल. हे सरकारनं युद्धपातळीवर निर्णय घ्यावा, अशी मी विनंती करतो. मराठा समाजाच्या लढाईपेक्षा हा न्यायप्रविष्ट विषय आहे. २५ जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय होईल किंवा अंतिम सुनावणी होऊन निर्णय येईल.” सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली

संभाजीराजे पुढे असं म्हणाले कि, “मी असं म्हणणार नाही की, रोहितगी आणि इतरांनी आपली बाजू चांगली मांडली नाही, असं मी म्हणणार नाही. रोहितगींसह सर्व सहकाऱ्यांनी जोमाने बाजू मांडली. पण बाजू मांडत असताना पुढची तारीख का मागितली हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला समजला नाही. पुढची तयारी करायची म्हणून पुढची तारीख मागितली का? दुसऱ्या कुठल्या विषयासाठी मागितली हे मला काही कळालं नाही. पण तोपर्यंत सरकार या मुलांसाठी काय करणार आहे. काय मदत देणार आहे, हे सरकारनं सांगावं. आज महाविद्यालये सुरू झाली आहेत. ही सुनावणी पुढे किती दिवस चालणार माहिती नाही. माझ्या डोळ्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारने भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. कालही ते सकारात्मक दृष्टिकोनातून माझ्याशी बोलले. मोठेपण दाखवत स्वतःहून फोन करून चर्चा केली. सगळं मान्य आहे, पण पुढे काय करायचं हे सरकारनं सांगावं,”