Pimpri

आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंत्याची परदेशवारी

By PCB Author

January 14, 2023

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासह तीन अधिकारी रविवार (दि.15) रोजी दुबईवारीसाठी रवाना होणार आहेत. त्यांचा हा दौरा शुक्रवार (दि.20) पर्यंत असणार आहे. या दौ-यात दुबईमध्ये विकसित करण्यात आलेल्या सिटी सेंटरच्या मॉडेलचा अभ्यास केला जाणार आहे. प्रशासनाकडून या दौ-याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. दरम्यान, आयुक्त सिंह सहा दिवस नसल्याने आयुक्त पदाचा पदभार अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांच्याकडे दिला जाण्याची शक्यता आहे.

आयुक्त शेखर सिंह यांच्याबरोबर शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी असणार आहेत. मुंबई, नवी दिल्लीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे सिटी सेंटर बांधण्यात येणार आहे. सिटी सेंटरच्या कामासाठी सल्लागार नियुक्तीसाठी देशपातळीवर निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. तीन वेळा निविदा प्रसिध्द करुनही केवळ एकच निविदा प्राप्त झाली. अखेरीस ऍडव्हायझर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (केपीएमजी) या सल्लागार एजन्सीची तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी नियुक्ती केली आहे. या सल्लगार संस्थेला 12 महिन्यांसाठी 2 कोटी 9 लाख रुपयांचे शुल्क देण्यात आले आहे. महापालिकेने चिंचवड स्टेशन येथील डी मार्टजवळील 1 लाख 37 हजार 39.46 चौरस मीटर इतकी जागा पिंपरी – चिंचवड बिझनेस सेंटरसाठी आरक्षित केली आहे.

महापालिकेस भरीव स्वरुपाचे आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर सिटी सेंटर बांधण्याचे पालिकेचे नियोजन आहे. सिटी सेंटरमध्ये कार्यालये, हॉटेल, करमणूक केंद्र, व्यापारी गाळे, बहुउद्देशीय हॉल, वाहनतळ आदी सुविधा असणार आहेत. नवी दिल्लीतील हेबिहाट सेंटर, मुंबईतील माइन्स स्पेस मालाड आणि बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्‍स, हुस्टन सिटी अमेरिका, दुबई धर्तीवर हे सेंटर उभारले जाणार आहे. दुबईमध्ये अत्याधुनिक पध्दतीने सिटी सेंटर उभारण्यात आली आहेत. त्यामुळे आयुक्तांनी दुबईतील सिटी सेंटरच्या मॉडेलचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे नियोजन केले आहे.