Maharashtra

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला

By PCB Author

March 24, 2020

 

नागपूर, दि.२४ (पीसीबी) -कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर ही प्रमुख शहर पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील काही नागरिक शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करताना दिसत आहेत. तर खासगी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जात आहे.

असाच प्रकार नागपूर मध्येही घडत होता. मात्र आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. दोन कंपन्यांना मनपाच्या शोध पथकाने दीड लाखांचा दंड ठोठावला आहे.

शहरातील सर्व खासगी, कॉर्पोरेट व अन्य आस्थापना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले होते. असे असतानाही वर्धमान नगर येथील ठवकर कंपनीतील सुमारे ६० ते ७० लोकांना कामावर बोलावण्यात आले होते. कंपनीचे शटर बंद ठेवून त्यांच्याकडून काम करवून घेतले जात होते.

याबाबत मनपाच्या नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तेथे धाड मारली. आदेशाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच दंड ठोठावण्यात आला. वेळोवेळी सांगूनही जर नागरिक कायद्याचे उल्लंघन करीत असेल तर यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.