Pimpri

आयसोलेशन वार्डला विरोध करणाऱ्या दोन नगरसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले

By PCB Author

May 26, 2020

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – प्रशासनाने आयसोलेशनसाठी ताब्यात घेतलेल्या इमारतीत कोरोना बाधित परिसरातील नागरिकांना ठेवण्यासाठी विरोध केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू मिसाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात प्रशासनाने कठोर भूमिका घ्याली अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका सिमा सावळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती. कोरोनाग्रस्त आनंदनगरच्या काही कार्यकर्त्यांनीही त्यांचे समर्थन केले होते. चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचा कहर सुरु आहे. झोपडपट्टीतील कोरोना आटोक्यात आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे प्रशासनाने आनंदनगरमधील नागरिकांना निगडीतील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहे.

शुक्रवारी (दि. 22) 14 नागरिकांना तिथे क्वारंटाईन केले आहे. 500 नागरिकांना तिथे क्वारंटाईन करण्याचे नियोजन आहे. परंतु, आनंदनगरमधील नागरिकांना त्या परिसरातच क्वारंटाईन करावे. निगडी प्राधिकरण आणि आकुर्डीचा काही भाग असलेल्या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. त्यामुळे हा परिसर ग्रीन झोन आहे. आमच्या ग्रीनझोनमध्ये तेथील नागरिकांना क्वारंटाईन करु नये. प्रभागातील नागरिकांना त्याचा धोका निर्माण होईल, अशी भिती व्यक्त करत स्थानिक नगरसेवकांनी त्याला विरोध केला. मागील तीन-चार दिवसांपासून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून हा विरोध सुरू होता. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही नगरसेवकांना आज (दि.26) ताब्यात घेतले आहे. नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक अमित राजेंद्र गावडे, माजी महापाैर आर.एस.कुमार, माथाडी मंडळाचे माजी सदस्य व  भाजपाचे युवा कार्यकर्ते अनुप मोरे, नगरसेविकेचे पती राजेंद्र बाबर यांच्यासह योगेश बाळकृष्ण जाधव, निलेश अनिल जांभळे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 149 अन्वये नगरसेवकांना नोटीस देण्यात आली आहे. जमावबंदिचा भंग केल्याबद्दल या सर्वांना नोटीस देऊन सायंकाळी सोडून देण्यात आले. 

निगडी प्राधिकारणात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. निगडी प्राधिकरण परिसरात कोरोनाबधित नागरिक सापडल्यास त्यांना पीसीसीओई किंवा इथल्याच भागात आयसोलेट करावे. तसेच जिथल्या तिथे सोय करता येत नसेल तर गहुंजे स्टेडियम प्रशासनाने ताब्यात घेऊन तिथे अनेकांची सोय होऊ शकते. प्रशासनाने आयसोलेट केलेल्या नागरिकांना चहा, नाश्त्याची व्यवस्था आम्ही केली होती. त्यामुळे माणूस म्हणून आमचा त्याला विरोध नाही. ज्या परिसरातील कोरोनाबधित नागरिक आहेत. त्यांची तिथल्याच परिसरात सोय करावी. ते प्रशासनाला सोयीचे होईल. जे 14 नागरिक आयसोलेट केले होते, त्यातील तिघांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे त्याचा निगडी प्राधिकरण परिसरातील नागरिकांना धोका संभावू शकतो, असे स्थानिक नगरसेवकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, ही शहरातील एका भागातील अडचण नाही. सर्वच ठिकाणच्या नागरिकांनी विरोध करायचे ठरवले. तर कसे करता येईल. अशा स्वरुपाची भुमिका कोणत्याही नागरिकांनी घेवू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले होते.

‘प्रशासनाने आयसोलेशन सेंटर बनविण्यासाठी आकुर्डी येथील एका महाविद्यालयाची इमारत ताब्यात घेतली आहे. त्यास संबंधित नगरसेवकांचा विरोध होता. त्यामुळे त्यांना ताब्यात घेतले आहे. योग्य ती कारवाई केली जाणार आहे.’, असे रावेत चौकीचे पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांनी म्हटले.