Sports

आयपीएल संघ, कर सवलत, क्रिकेट समिती आणि खूप काही

By PCB Author

December 23, 2020

अहमदाबाद दि.२३ (पीसीबी) : आयपीएलमधील दोन नव्या संघांचा समावेश, कर सवलत, विविध क्रिकेट समित्यांची नियुक्ती आणि अन्य बऱ्याच विषयांसह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ८९वी वार्षित सर्वसाधारण सभा उद्या येथील सरदार मोटेरा स्टेडियमवर पडणार आहे. या बैठकीत राजीव शुक्ला बीसीसीआयचे नवे उपाध्यक्ष होतील, तर ब्रिजेश पटेल आयपीएली जबाबदारी पुन्हा सांभाळतील. शुक्ला यांची एकमताने बिनविरोध निवड झाली, तर पटेल यांच्यावरील विश्वास कायम ठेवण्यात आला.

गांगुलीचा जाहिरातीमधील सहभाग बैठकीत अध्यक्ष सौरभ गांगुली यांना त्यांच्या व्यावसायिक जाहिरातींमधील सहभाग आणि परस्पर हितसंबंध याबाबत कोण प्रश्न विचारणार आणि गांगुली यांची त्यावर का. प्रतिक्रिया असणार हा देखील एक मुख्य विषय बैठकीत चर्चेला येऊ शकतो.

आयपीएलमधील संघ त्याचबरोबर आयपीएलमध्ये दोन नव्या संघांच्या समावेशाविषयी होणारा निर्णय देखिल लक्षवेधी ठरणार आहे. दोन संघांच्या समावेशाच्या निर्णयावरून बीसीसीआयमध्येच दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळेच हा मुद्दा सर्वाधिक चर्चेला येईल. एक गट २०२२ पासून आयलपीएल मधील संघ वाढवावेत अशी भूमिका घेत आहे, तर दुसरा गट पुढील वर्षीपासून दोन नव्या संघाच्या समावेशाविषयी आग्रही आहे.

कर सवलत भारतात होणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धांसाठी शंभर टक्के कर सवलत मिळावी अशी आग्रहाची भूमिका आयसीसीने घेतली आहे. त्यावर आपले मत कळविण्यासाठी बीसीसीआयला आपले मत कळविण्यासाठी केवळ आठवडा बाकी आहे. त्यामुळे हा विषय देखील बीसीसीआयला याच बैठकीत निपटावा लागणार आहे. भारतात पुढील वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या टी २० विश्वकरंडक स्पर्धेसाठी आयसीसीने ही प्रमुख अट घातली आहे. ही अट मान्य न झाल्यास आयसीसीने स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे खेळविण्यात येईल असा इशारा देखिल दिला आहे.