Desh

आयटी हब बंगळुरु जवळ ऑनर किलिंग, वडिल व दोन चुलत भावांचे कृत्य

By PCB Author

October 17, 2020

बंगळुरु, दि.१७ (पीसीबी) – दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून एका तरुणीची तिच्या वडिलांनी आणि दोन चुलत भावांनी मिळून हत्या केली. बंगळुरूपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामगनाग्रा जिल्ह्यात ऑनर किलिंगचे हे प्रकरण समोर आले आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सुरुवातीला तरुणी बेपत्ता असल्याची नोंद केली होती. पण नंतर ऑनर किलिंगची ही घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नऊ ऑक्टोंबरला मुलीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. ती बी. कॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. तक्रार नोंदवल्यानंतर दुसऱ्यादिवशी तक्रारदाराच्या भावाच्या शेतात मुलगी मृतावस्थेत आढळली. “पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी तिघांनी हत्येचे कारस्थान रचले होते. आठ ऑक्टोबरला तिघांनी मिळून मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह शेतात पुरला. दुसऱ्या दिवशी आरोपी असलेल्या मुलीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली” अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सीमंत कुमार सिंह यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

“नेमकं काय प्रकरण आहे, तो शोधून काढण्यासाठी पोलिसांनी २१ सदस्यीय पथकाची स्थापना केली होती. १० ऑक्टोबर रोजी मुलीचा मृतदेह सापडला. कुटुंबासमोर मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलीच्या पालकांच्या चेहऱ्यावर कुठलेही दु:खाचे भाव दिसले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशी केल्यानंतर हे ऑनर किलिंगचे प्रकरण असल्याचे समोर आले” रामगनाग्राचे एसपी गिरीश यांनी सांगितले.