आयटी मधील तब्बल ४५ हजारावर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या

0
254

पुणे, दि. १८ (पीसीबी) : संपूर्ण जगावर आलेली करोनाची महामारी; यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातील सर्वांत महत्वाचे म्हणजे अनेक क्षेत्रातील रोजगार गेले असून काहींच्या पगारात कपात झालेली आहे. याची नेमकी कारणे स्पष्ट होत नाहीत. या लॉक डाऊन मुळे अनेक संसार रस्त्यावर आले आहेत. यामध्ये आयटी हब असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला मोठा फटका बसला आहे. तब्बल ४५ हजारावर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

महाराष्ट्रातील हिंजवडी, खराडी, मगरपट्टा परिसरातील नामांकित आयटी कंपन्यात काम करत असलेले आयटी इंजिनियर सध्या अस्थिर परिस्थितीमधून जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुमारे ४५ हजार कर्मचाऱ्यांना नाेकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत. प्रसिध्द आयटी कंपन्याचे दरवर्षीच्या आर्थिक उलाढालीत किंवा कामाच्या मागणीत कुठेही घट झालेली नसतानाही कर्मचाऱ्यांचे २०ते ५० टक्क्यांपर्यंत पगार कपात केल्याने वेगवेगळया अडचणींचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.

नेसेन्ट इनफार्मेशन टेक्नाेलाॅजी एम्प्लाइज सीनेट (निटस) या महाराष्ट्रातील आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडे २३ हजार कर्मचाऱ्यांनी पगार कपातीच्या तक्रारी केल्या असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हरप्रीत सलूजा यांनी दिली आहे. सलूजा म्हणाले, एप्रिल पासून आतापर्यंत निटसकडे ७८ हजार हून अधिक कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीरपणे नाेकरी कंपनीने संपवणे, वेतन कमी करणे, कर्मचाऱ्यांचे राजीनामाकरिता दबाव अाणणे, सुट्टी मध्ये कपात करणे, मातृत्व लाभ न देणे अशा विविध प्रकारचे तक्रारी आले आहे. प्रसिध्द टाटा टेक्नाॅलाॅजी, विप्राे, टेक महिंद्रा, केप जेमिनी अशासारख्या नामांकित कंपन्यात कर्मचारी कपात माेठया प्रमाणात करण्यात आली आहे.

वर्क फ्राॅम हाेमची सुविधा कर्मचाऱ्यांना आयटी कंपनीने दिली आहे. परंतु त्यामुळे कामाचे तास वाढून ही ओव्हरटाईम दिला जात नाही, रात्रपाळीचा भत्ता देण्यात येत नाही, कामासाठी लागणाऱ्या वीजेचा भार कर्मचाऱ्यांचे अंगावर पडताे, वाय-फायचा खर्च यामध्ये वाढ झाली आहे. काही कंपन्या व माेठया एमएनसी कर्मचाऱ्यांचे शाेषण करतात व काॅर्पारेट ब्रॅंड नेम,जबाबदारी, पदाेन्नतीची संधी आणि नाेकरीच्या स्थिरतेच्या नावाखाली अतिरिक्त तास काम करण्यास सांगतात. आयटी उद्याेगात काम करणारे कर्मचारी त्यांच्या कामाच्या सतत शारिरिक व मानसिक तणावामुळे बऱ्याचे अाराेग्याच्या समस्या निर्माण झाले आहे.