आम्ही सत्तेत येणार नाही, याची खात्री होती; म्हणूनच मोठमोठी आश्वासने दिली- नितीन गडकरी

0
1028

मुंबई, दि. १० (पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेले विधान पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये देण्याच्या आश्वासनाबद्दल केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “आम्ही सत्तेत कधीच येणार नाही, याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे मोठमोठी आश्वासने देण्याचा सल्ला दिला होता.

“आता आम्ही सत्तेत आहोत. जनता आम्हाला त्या आश्वासनांची आठवण करुन देते. मात्र सध्या आम्ही त्यावर हसतो आणि पुढे जातो,” असे गडकरी म्हणाले. त्यांचे हे विधान म्हणजे विरोधकांना आयतं कोलीत मिळाल्यासारखं आहे. मोदी सरकारला घेरण्यासाठी आयती संधीच आहे.

‘कलर्स मराठी’ चॅनलवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमातील नितीन गडकरींचा ही मुलाखत आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. यामध्ये गडकरींसह अभिनेते नाना पाटेकरही पाहुणे म्हणून आले होते.

नितीन गडकरींच्या या टिप्पणीवर विरोधी पक्ष काँग्रेसने त्वरित ट्वीट केला आहे. या ट्वीटनुसार, “गडकरी यांनी सिद्ध केलं की भाजप सरकार जुमले आणि खोट्या आश्वासनांवर स्थापन झाले आहे.” इतकेच नाही तर खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही यावर ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “तुम्ही अगदी बरोबर आहात. जनताही आता असाच विचार करतेय की, सरकारने त्यांच्या अपेक्षा आणि विश्वासाचा वापर पक्षाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला आहे.”