Maharashtra

आम्ही शिवसेनेला अथवा शिवसेनेचा आम्हाला कोणताही प्रस्ताव नाही – देवेंद्र फडणवीस

By PCB Author

July 28, 2020

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : “शिवसेनेला आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही आणि शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही” असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

“कोणताही प्रस्ताव शिवसेनेकडून आम्हाला अथवा त्यांच्याकडून भाजपला आला नाही. भाजप आता स्वत:च्या ताकदीवर यापुढे असेल” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याचं पावसाळी अधिवेशन सप्टेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकललं असल्याची माहितीही त्यांनी दिली. “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. बिहारच्या राजकारणाचा दाखला देत चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बोलून दाखवली. आम्ही हात पुढे केला असा त्याचा अर्थ नाही, भविष्यातील या राजकीय शक्यता असल्याचे ते म्हणाले. “जीएसटी संदर्भात राज्य सरकारचे मंत्री आरोप लावत होते. केंद्राने 19 हजार 200 कोटी रुपयांचा जीएसटीचा परतावा महाराष्ट्राला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पैसा दिला. पीएम केअरमधून सर्वात मोठी मदत महाराष्ट्राला झाली आहे. जीएसटीचा सर्वधिक परतावाही महाराष्ट्रालाच मिळाला. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राचे आभार मानायला हवेत” असेही फडणवीस म्हणाले. “अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होईल, आम्ही ठिकठिकाणी हा महोत्सव साजरा करु. व्हिडिओ कॉन्फरन्सने भूमिपूजन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एमआयएमची मागणी ऐकून आश्चर्य वाटलं आहे. उद्धव ठाकरे हे एमआयएमची भाषा बोलत आहेत. राम मंदिर भूमिपूजन त्याच ठिकाणी व्हावं, ही सर्वांची इच्छा आहे, कोट्यवधी हिंदू नागरिकांचं स्पष्ट मत आहे, की त्या जागेवर जाऊन पूजन करावं” असा दावाही फडणवीस यांनी केला.