Maharashtra

आम्ही यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं-देवेंद्र फडणवीस

By PCB Author

October 16, 2021

मुंबई , दि. १६ (पीसीबी) : इडीच्या कारवायांवरून मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला होता. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदी एजन्सींचा वापर करण्याच्या विरोधात आहेत. ते कधीच एजन्सीचा गैरवापर करत नाहीत. आम्ही यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एजन्सींच्या वापराच्या विरोधात आहे. कधीही ते एजन्सीचा गैरवापर करू देत नाहीत. एजन्सीच्या कामातही येत नाहीत. एजन्सीचा राजकीय वापर करू देत नाही. अन्यथा एजन्सीचा वापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं असतं, असं फडणवीस म्हणाले. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. मागच्या काळात काँग्रेस आणि इतरांनी एजन्सींचा दुरुपयोग केला. आम्ही तसा गैरवापर केला नाही. पण एक गोष्ट नक्की आहे. भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदी स्वस्थ बसणार नाही. भ्रष्टाचार केला असेल त्यांनी घाबरावं. ज्यांनी केला नाही त्यांनी घाबरू नये, असं फडणवीस म्हणाले.ईडी, सीबीआयबाबत मुख्यमंत्री बोलले. ती का येते? ती आम्ही नाही आणली. त्याचं कारण म्हणजे तुम्ही ज्या सरकारचं नेतृत्व करत आहात ते भ्रष्ट सरकार आहे. इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. खंडणी उकळणं हाच या सरकारचा अजेंडा आहे, असा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. यूनियनबाजी आणि खंडणीने बंगालमध्ये एकही उद्योग टिकला नाही. कोलकाताची आजची व्यवस्था काय आहे हे माहीत आहे का? जो तुमच्या विरोधात बोलेल त्याचं मुंडकं छाटून त्याला फासावर लटकावयाचं आहे का? जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा शेटचा थेंब आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. जोपर्यंत भाजप जिवंत आहे. तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. काय वाटेले ते करू पण महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.