आम्ही बिळातून नव्हे, तर दिल्लीच्या मुख्य दरवाजाने मानाने जातो- आमदार दिलीप सोपल

0
723

सोलापूर, दि. १९ (पीसीबी) – आम्ही बिळातून नव्हे, तर दिल्लीच्या मुख्य दरवाजाने मानाने जातो. तुमचा प्रतिसाद पाहून एक निर्णय ठामपणे घेण्याची वेळ आली आहे,  असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेना प्रवेशाचे सूतोवाच केले.

आमदार दिलीप सोपल यांनी पक्षाच्या मुंबईतील बैठकीकडे पाठ फिरवून बार्शीत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला . त्यामुळे   दिलीप सोपल शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यावर बोलताना आमदार सोपाल म्हणाले की, माझा जनतेशी कायम संवाद सुरू असतो. हा संवाद चार पिढ्यांबरोबर सुरु आहे. माझ्या डोक्यातील संभ्रम मला अवस्थ करू लागला आहे. तालुका हेच माझे कुटुंब झाले आहे. ज्यावेळी पक्षाने उमेदवारी नाकारली त्यावेळी लोकांत संताप निर्माण होऊन मला अपक्ष आमदार केले. २०१४ च्या लाटेतही मला निवडून दिले.

दरम्यान, मुंबईतील  राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीकडे पाठ फिरवून सोपल यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. व त्यात आपली भूमिका स्पष्ट केली.  यावरून  ते राष्ट्रवादीला  रामराम करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला मोठा  धक्का बसण्याची शक्यता आहे.