‘…आम्ही तर सुरक्षेशिवाय फिरणारे लोकं आहोत. हवं तर आहे ती पण सुरक्षा काढून घ्या’

0
250

मुंबई, दि.११ (पीसीबी) : ठाकरे सरकारने भाजप, मनसेसह आणखी काही बड्या नेत्यांच्या सुरक्षे कपात केली. यावर प्रतिक्रिया देताना “सुरक्षा काढणं किंवा ठेवणं यामुळे आमच्यावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोकं आहोत. आहे तेवढी सुरक्षा पुरेसी आहे व ती ठेवली नाही तरी देखील आम्हाला काही अडचण नाही.” असं उत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी आज लोणावळा येथील पत्रकारपरिषदेत म्हटलं आहे.

फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार आहे. फडणवीस यांच्याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेतही सरकारकडून कपात करण्यात आली आहे. याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावार फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “मी वर्षानुवर्षे अगदी प्रदेशाध्यक्ष असतानाही एक साधा सुरक्षा रक्षक माझ्याजवळ नव्हता. मी गडचिरोलीला जायचो, सिरोंच्याला देखील जायचो, सगळीकडे जायचो. आज देखील मला एकही सुरक्षा रक्षक दिला नाही तरी मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतो. त्यामुळे आमची त्यावर कुठलीही तक्रार नाही, आक्षेप नाही. काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं, की जे काही आमचे सुरक्षा रक्षक काढले आहेत. त्यांचा वापर तुम्ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी करा. या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायच्या ऐवजी जरा भंडारा सारख्या घटेनवर अधिक लक्ष सरकारने केंद्रीत केलं पाहिजे.”