Maharashtra

आम्ही कागदी वाघ नाही; मुख्यमंत्र्यांची सेनेवर अप्रत्यक्ष टीका

By PCB Author

July 16, 2018

नागपूर, दि. १६ (पीसीबी) –  आपला पक्ष ‘मॅन टू मॅन’ आणि ‘हार्ट टू हार्ट’ पर्यंत जाणार पक्ष आहे. तो माध्यमांच्या भरवशावर चालत नाही. ‘.. वी आर नॉट पेपर टायगर्स’ मात्र  काही नेते फक्त वर्तमान पत्रांमध्ये बातम्या छापून आणून स्वत:ला मोठे नेते समजतात, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

ते कोराडी येथे आयोजित पूर्व विदर्भातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, २०१४ मध्ये १७ कोटी मतदात्यांमुळे पक्ष केंद्रात २८५ जागा जिंकून सत्तेत आला. २०१९ च्या निवडणुकीत ४० कोटी मतदात्यांच्या पाठीब्यांने पक्ष पुन्हा सत्तेत येईल.  भाजप कार्यकर्तेचे खरे ‘टायगर्स’ आहेत. तुम्ही जनतेत जाऊन काम करणारे लोकं आहात. मात्र काही लोक वर्तमानपत्राच्या माध्यमातून स्वत:ला मोठे करण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या सोशियल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आपल्या कामाबद्दल भ्रम पसरवण्याचे काम करत आहे. मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी तर्कशुद्ध माहितीच्या आधारे त्याला प्रत्युत्तर द्यावे. स्वामिनाथन समितीची अहवाल २००५ मध्ये येऊन ही तेव्हा मनमोहन सिंह, शरद पवार सारखे नेते गप्प बसले आणि आता तेच  नेते शेतकऱ्याचे कैवारी बनून आंदोलन करीत आहेत. उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देण्याची हिंमत मोदींनी दाखवली आणि त्यासाठी सरकारी   तिजोरीतून हजारो कोटी देऊ  केले, हे सत्य लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.