‘आम्ही अजून हातात बांगड्या घातलेल्या नाही’; मराठा आरक्षण मुद्यावरून नितीन राऊत आक्रमक

0
250

अहमदनगर, दि.११ (पीसीबी) : उर्जामंत्री नितीन राऊत यांनी “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यांना विरोध नाही. पण आम्ही अजूनही हातात बांगड्या घातलेल्या नाही. आम्ही काय भिकारी आहोत का?” असा प्रश्न केला आहे. मराठा आरक्षण आणि पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण या दोन मुद्द्यांवरुन नितीन राऊत यांनी आक्रमक इशारा दिला आहे. काँग्रेस नेते आणि उर्जामंत्री नितीन राऊत हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पदोन्नतीतील आरक्षणाच्या संबंधित अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, व्ही जे, एनटी यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मते काय आहे हे जाणून घेणार आहेत.

दरम्यान, नितीन राऊत म्हणाले कि, ‘आम्ही जे संविधानात्मक आहे जे भारतीय राज्यघटनेने दिले आहे, तेच आम्ही मागतो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यांना विरोध नाही. मात्र त्यांनीसुद्धा मोठेपणा दाखवून आम्हाला वेठीस धरू नये. आमचं भांडवल करून तेच फक्त काम करु शकतात, आम्ही करु शकत नाही, अशी भूमिका घेऊ नये. आम्ही अजून हातात बांगड्या घातलेल्या नाही. तसेच आम्ही भिकारी नाही.’

राज्य सरकारने 7 मे रोजी पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याची अधिसूचना काढली होती. मात्र, हा निर्णय घेताना मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासाठी राज्य मंत्रिमंडळाची जी उपसमिती तयार करण्यात आली त्या समिती विश्वासात घेण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेकांनी रोष व्यक्त केला होता.