आम्हाला पाच एकर जमिनीची भिक नको- असदुद्दीन ओवेसी

0
514

हैदराबाद, दि. ९ (पीसीबी) – अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी असमाधान व्यक्त केले आहे. मशिदीसाठी पाच एकर जमिनीची ऑफर नाकारली पाहिजे हे माझे वैयक्तिक मत असल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च नक्कीच आहे, पण अचूक नाही. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिद पाडली नसती तरीही सर्वोच्च न्यायालयाने हाच निर्णय दिला असता का?, असा प्रश्नही ओवेसी यांनी उपस्थित केला.

निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना ओवेसी म्हणाले, “मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने समाधानी नाही. ज्यांनी बाबरी मशिद पाडली, न्यायालयाने त्यांनाच ट्रस्ट बनवण्याचा आदेश दिला. बाबरी मशिद पाडली नसती तर न्यायालयाने काय निर्णय दिला असता?”. याशिवाय पाच एकर जमीन नाकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.

“मुस्लिमांसोबत अत्याचार झाला आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. मुस्लीम एवढाही गरीब नाही, की तो पाच एकर जमीनही खरेदी करु शकत नाही. जर मी हैदराबादच्या जनतेलाही भीक मागितली तर पाच एकर जमीन घेता येईल. आम्हाला कुणाच्याही भिकेची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया ओवेसींनी दिली.