आम्हाला चीनची गरज नाही- डोनाल्ड ट्रम्प

0
435

न्यूयॉर्क, दि. २४ (पीसीबी)- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर हल्लाबोल करत आपल्याला चीनची गरज नसल्याचे म्हटले आहे. चीनने अमेरिकेच्या ७५ अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत चीनमधील अमेरिकन कंपन्यांना आपला व्यवसाय गुंडाळण्याचे आदेश दिले आहेत.

“आम्ही चीनसोबत व्यवहार करून अब्जावधी डॉलर्स गमावले आहेत. चीन आमच्या बौद्धीक संपदेचा वापर करून दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची कमाई करत आहे. परंतु आता आम्ही तसे होऊ देणार नाही. आता आम्हाला चीनची गरज नाही. चीनशिवाय आम्ही उत्तम स्थितीत राहू,” असे ट्रम्प यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर अमेरिकेचा शेअर बाजार चार तासांमध्ये ३ टक्क्यांपर्यंत कोसळला होता.

“चीनमधील अमेरिकन कंपन्यांनी आपला व्यवसाय पुन्हा अमेरिकेत आणावा, असे आदेश मी देत आहे. त्यांनी तात्काळ अन्य देशांचा पर्याय शोधावा. अमेरिकेसाठी ही मोठी संधी आहे. फेडेक्स, अॅमेझॉन, यूपीएस या कंपन्यांनी चीनमधून येणाऱ्या फेंटानिल औषधांची डिलिव्हरी बंद करावी. यामुळे दरवर्षी एक लाख अमेरिकन नागरिकांचा मृत्यू होत आहे,” असेही ते यावेळी म्हणाले.