आम्हाला अशीच लढत अपेक्षित होती- विराट कोहली

0
342

बेंगळुरू, दि. २३ (पीसीबी) – टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ९ विकेट राखून पराभूत केले. या पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने रणनिती स्पष्ट केली. ‘हा सामना आमच्यासाठी एकप्रकारे धडा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपूर्वी प्रथम फलंदाजी करून आम्ही स्वतःला आजमावत राहू,’ असे तो म्हणाला.

‘संघ अशा पद्धतीच्या सपाट खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्यापासून कदापि मागे हटणार नाही. अशा खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करून स्वतःला आजमावत राहू. हा आमच्या रणनितीचा भाग आहे,’ असे कोहली म्हणाला. आम्हाला अशाच प्रकारची लढत अपेक्षित होती. टी-२० वर्ल्डकपपूर्वी आम्हाला अशा प्रकारच्या कठीण लढतींना सामोरे जायचे आहे. मोठ्या स्पर्धेत खेळण्यापूर्वी प्रथम फलंदाजी करण्याचा ‘पॅटर्न’ आजमावत राहू, असेही त्याने सांगितले. यावेळी कोहलीने दक्षिण आफ्रिका संघाचे कौतुक केले. त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात त्यांच्या गोलंदाजीला खेळपट्टीची चांगली साथ मिळाली, असे कोहली म्हणाला.

कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यावर कोहली म्हणाला, वर्ल्डकपपूर्वी कोणत्याही परिस्थितीत संघाला आजमावून पाहायचे आहे. टी-२० क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणे अपेक्षित असते. अन्य प्रकारांमध्ये भागीदारीसाठी बराच वेळ मैदानावर खेळावे लागते. पण इथे तर ४०-५० धावांची भागीदारी खूपच फायदेशीर ठरते.’ सध्या स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी मिळत आहे. हे खेळाडू आमच्यासाठी अनोळखी आहेत असे नाही. त्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि त्यामुळेच ते आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहेत, असेही त्याने स्पष्ट केले.