आमदार विरुध्द खासदार `सोशल मीडिया` वॉर सुरू, लोकसभेला आम्ही कोल्ह्याची शिकार कऱणार – आमदार महेश लांडगे..

0
1054

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे विरुध्द भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार महेश लांडगे यांच्यात अक्षरशः जुंपली आहे. `पॉलिटिक्स वुथ रिस्पेक्ट` च्या नावाखाली आमदारांनी सुरू केलेले राजकारण आता एकदम वैयक्तीक पातळीवर घसरले आहे. `चाकण विमानतळाला पाठिंबा द्या`, म्हणून आमदार लांडगे यांनी आवाहन केले होते.खासदार डॉ. कोल्हे यांनी त्याला बिनशर्त पाठिंबा दिला, पण `पुणे नाशिक महामार्गाचे भूसंपादन का रखडले`, असा मार्मिक सवाल त्यांनी केला होता. त्यामुळे आमदार लांडगे जाम खवळले आणि स्वतंत्र पत्रक काढून `आगामी लोकसभेला आम्ही कोल्ह्याची शिकार कऱणार`, असे थेट आव्हानच दिल्याने आता हा वाद चिखळला आहे. खासदार- आमदारांच्या या आरोप-प्रत्यारोपांनी राजकिय वातावरण ढवळून निघाले असून पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकिला हा संघर्ष अधिक पेटणार असल्याचे दिसते आहे.

 

पुरंदर तालुक्यात होणारे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्र सरकराने परवानगी नाकारल्याने ते रद्द झाले आहे. तोच धागा पकडून आमदार लांडगे यांनी एक प्रसिध्दी पत्रक काढले. परिसरातील खासदार-आमदारांनी या विषयावर एकत्र प्रयत्न केले तर पूर्वी या विमानतळासाठी जो चाकण एमआयडीसी चा विचार सुरू होता त्यासाठी पुन्हा प्रयत्न करता येतील. राजकिय मतभेद बाजुला ठेवून प्रयत्न करू या, असे पत्रात म्हटले होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याला तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी दिलेल्या पत्रात, सखोल माहिती घेऊन विमानतळाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन डॉ. कोल्हे यांनी दिले. त्याशिवाय, पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरी रुंदिकरण नाशिकफाटा ते मोशी या टप्प्यात केवळ भूसंपादनाअभावी रखडल्याचा कळीचा मुद्दा डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केला. महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने या भूसंपादनास आपले सहकार्य मिळाले तर सहापदरीकरणाचे काम लवकर होईल, असे डॉ. कोल्हे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. `विमानतळ तर होणारच… आधी रस्त्यासाठी भूसंपदान करा…`, असे एक पत्रक खासदार डॉ. कोल्हे यांच्या नावाने सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले. नेमका तोच मुद्दा आमदार लांडगे यांना अत्यंत जिव्हारी लागला.
खासदार डॉ. कोल्हे यांच्या पत्राला सडेतोड उत्तर देणारे प्रसिध्दीपत्रक आमदार लांडगे यांनी व्हायरल केले. त्या पत्रकाच्या शेवटी अत्यंत स्पष्ट शब्दांता, लोकसभा निवडणुकिला आम्हीच कोल्ह्याची शिकार करणार, अशी दर्पोक्ती केली आहे. पत्रकात आमदार लांडगे म्हणतात, पॉलिटिक्स वुथ रिस्पेक्ट ह्याच शिर्षक वाक्यावर आज तागायत आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या सहकारी मित्रांची वाटचाल सुरू आहे. स्वबळावर लढण्याचा आणि विक्रमी मताधिक्य घेऊन निवडूण येण्याचा पराक्रम केला आहे. त्यासाठी शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची मराठी मालिकांमध्ये भूमिका किंवा इतर अभिनेता बनून निव़णूक जिंकणे कठिण काम नाही. तुम्ही फक्त थोर व्यक्तमत्व पडद्यावर रंगवली पण वाईट या गोष्टीचे वाटते की छत्रपतींचे विचार व गुण तुम्ही आत्मसात करू शकले नाही, अशी टीका लांडगे यांनी केली आहे.
आमदार लांडगे म्हणतात…
खासदार डॉ. कोल्हे यांनी नाशिकफाटा ते मोशी दरम्यानच्या महामार्गाचे सहापदरीकरणासाठी भूसंपादनाचा मूळ प्रश्न उपस्थित केला, त्याला बगल देत आमदार लांडगे म्हणतात, जसं बैलगाडा शर्यत आम्ही सुरू केली तसेच खेड विमानतळ पण आम्हीच सुरू करणार. भोसरीत स्वराज्य भूषण छत्रपती संभाजी महाराज यांचा जगाचे लक्ष वेधून घेणारा भव्य दिव्य पुतळा पण आम्हीच करणार. तळवडे येथील डियर पार्क पण आम्हीच करणार. शासकिय अभियांत्रिकी वशासकीय वैद्यकीय महाविद्यालयसुध्दा आम्हीच करणार. भाम आसखेड धरणातून पाणी पुरवठा योजना पण आम्हीच कऱणार. पवनेचे पाणी पण आम्हीच आणणार. कचऱ्यातून वीज निर्मिती पण आम्हीच करणार आणि नागपूरच्या धरतीवर दुमजली उड्डाणपूल करून नाशिकफाटा ते अगदी चाकण पर्यंत तुम्हाला अपेक्षित असलेली वाहतूक कोंडी पण आम्हीच सोडविणार. बहुतेक तुम्ही आमचे व्हिजन २०-२० ही मार्गदर्शिका वाचली नसावी. तुम्हाला नारायणगावात द्यायची व्यवस्था करतो. तुम्ही या सगळ्या कार्यक्रमांना लोकसभेचे सदस्य म्हणून हजेरी लावलीच पाहिजे, कारण politics with respect…
आमदार लांडगे आपल्या पत्रकात शेवटी म्हणतात, जाता जाता एक तुमच्याच मालिकेतील एका घटनेची आठवण खास करून तुम्हाला करून देतो. शिव स्वराज्यात शेतकरी वर्गाला शेतात कोल्ह्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला की छत्रपतीकडून जो कोणी त्यांची शिकार करून सबुत म्हणून शेपूट घेऊन यायचा त्याला सोन्याचे कडं इनाम म्हणून मिळायच…पुढच्या लकसभेचे इनाम म्हणून आम्ही हे घेणार हे तुम्हाला वचन देतो…