आमदार विनायक मेटेंचा नातेवाईक असल्याचे सांगून पोलिस निरीक्षकाला घातला ६ लाखांचा गंडा

0
738

शेवगांव, दि. १२ (पीसीबी) –  आमदार विनायक मेटे यांचा जवळचा नातेवाईक असल्याचे सांगून शेवगांव पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाला तब्बल ६ लाख २० हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गोविंद ओमासे असे फसवणूक झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी ओमासे यांनी शेवगांव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ हरिचंद्र इसारवाडे (रा.  गदेवाडी ता. शेवगांव) यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसारवाडे यांनी १० फेब्रुवारी २०१८ पासून ते ५ ऑगस्ट २०१८ या कालावधीत आमदार विनायक मेटे यांचा नातेवाईक आहे. तसेच त्यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेचा तालुकाध्यक्ष आहे. असे सांगून पोलिस निरीक्षख गोविंद ओमासे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मोबाईल (क्रमांक ९४२३२४९१९१) वर वेळोवेळी संपर्क करुन एका अज्ञात साथीदारांच्या मदतीने हुबेहुब आमदार विनायक मेटे यांच्या आवाजात वेगेवगेळ्या कारणासाठी पैशाची मागणी करुन तब्बल ६ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी शेवगांव पोलिस ठाण्यात इसारवाडे व एका अज्ञात इसमाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मगर करत आहेत.