आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांचा स्थायी समितीत राडा

0
636

पिंपरी, दि. 9 (पीसीबी): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सभापतींच्या मनमानी कारभारावर आक्षेप नोंदवून भाजपच्याच नगरसेवकांनी आज भरसभेत राडा घातला. चिंचवड मतदार संघातील भाजपच्या चार नगरसेवकांनी सभापतींच्या विरोधात हल्लाबोल करत सभागृहात जबरदस्त तोडफोड केली. टेबलावरील माईकची आदळआपट करून झटापटीत ग्लास फोडण्यात आले असून दरम्यान नगरसचिवांना देखील धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे स्थायी समितीच्या मागील महिन्यांच्या सभा घेता आल्या नाहीत. आचारसंहिता उठल्यानंतर आज स्थायी समितीची सभा घेण्यात येत आहे. त्यात सभागृहात प्रवेश करताना भाजपचे चिंचवड विधानसभा मतदार संघातील चार नगरसेवकांना सुरक्षारक्षकांनी आत जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर सभागृहात चिंचवड मतदार संघातील विकास प्रकल्पांच्या विषयावरून सभापती आणि आमदार लक्ष्मण जगताप समर्थक नगरसेवकांत चांगलीच हामरी तुमरी झाली.

सभापती संतोष लोंढे यांची भूमिका अक्षेपार्ह वाटल्यामुळे नगरसेवकांनी सभापतींच्या मनमानीविरोधात भरसभेत गोंधळ घालायला सुरूवात केली. सभापतींचा हा मनमानी कारभार कदापी चालू देणार नाही. भाजपच्याच नगरसदस्यांना सभागृहात प्रवेश करण्यास अटकाव करण्याचा उद्देश काय, असा प्रश्न करत सभा कामकाज बंद पाडण्याचा इशारा दोघांनी दिला. दरम्यान, टेबलवरील माईकची तोडफोड केली असून ग्लास फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नगरसचिव उल्हास जगताप यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकारही घडल्याचे सांगण्यात आले आहे.