Banner News

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात उसने अवसान आणलेली घोडीही फुरफुरू लागलीत…

By PCB Author

January 10, 2019

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये विरोधी पक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकहितविरोधी धोरणांवर टिका करण्याबरोबरच लोकजागृती करणे हे विरोधी पक्षांचे काम आहे. पण पिंपरी-चिंचवडमधील विरोधकांना आपले नक्की काय कर्तव्य आहे हेच समजत नसल्याचे चित्र आहे. आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असल्याने भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना टार्गेट करण्याच्या निर्धाराने उसने अवसान आणलेली अनेक घोडी नको तितकी फुरफुरू लागली आहेत. आपली ताकत किती, आपली झेप किती याचा विचार करण्याआधीच आमदार जगताप यांच्या पराभवाची दिवास्वप्ने पाहण्यात दंग झाले आहेत. परंतु, पिंपरी-चिंचवडमधील जनता अशा बाजारबुणग्या नेत्यांना किती साथ देईल, याबद्दल शंकाच आहे.

महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता जाऊन दोन वर्षे होत आली. शहरातून काँग्रेस नामशेष झाली आहे. दोन खासदार आणि एक आमदार असूनही शिवसेना कशीबशी तग धरून आहे. शिवसेनेत असताना डरकाळी फोडणारे बहुतांश वाघ भाजपवासी झाले, तर उर्वरित वाघांना निवडणुकीत जनतेने घरी बसवल्याने त्यांचे मांजर झाले आहे. जे शिवसेनेत आहेत, ते राष्ट्रवादीशी संधान साधून आहेत. असे मांजर राष्ट्रवादीत कधीही जातील, अशी राजकीय स्थिती आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना खांद्याला खांदा लावून पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला खलनायक ठरवण्याची संधी शोधत आहेत. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एकही अभ्यासू नेता नसल्याने भाजपकडून दोन्ही पक्षांना बेदखल केले जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही पक्षाचे काही नेते आरोपांनतर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यात दंग आहेत. भाजपच्या विरोधात पुरावे देता येत नसल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर जनतेसमोर तोंडघशी पडण्याची वेळ येत आहे. भाजपविषयी जनमानसांमध्ये नाराजीचे वातावरण तयार करण्यात आपण कमी पडतोय हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आता हळूहळू उमजू लागले आहे. त्यामुळे किरकोळ मुद्द्यावरूनही बोंब ठोकण्याचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एककलमी कार्यक्रम आखला आहे. परंतु सत्ताधाऱ्यांची झोप उडवण्याची हिंमत या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये नाही. विरोधकांच्या अशा किरकोळ आणि अदखलपात्र हल्ल्यांमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणखी मजबूत होताना दिसत आहे. विरोधक केवळ आगपाखड करू शकतात. पण आभ्यासपूर्ण बोलू शकत नाहीत, असा भाजपला आत्मविश्वास आला आहे.

विरोधकांनी आता भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. आमदार जगताप हे मावळ लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रबळ आणि ताकदीचे उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या, तरी आमदार जगताप यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे आमदार जगताप यांचा पराभव करायचा, या निर्धाराने विरोधकांची उसने अवसान आणलेली घोडी नको तितकी फुरफुरू लागली आहेत. सांगवीत आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेत फुरफुरणाऱ्या घोड्यांनी हाडे खाणाऱ्या मोजक्या पत्रकारांना खाऊ-पिऊ घालून आमदार जगताप यांच्याविरोधात उलटी केली. पवनाथडी जत्रेनंतर गोरगरीब रुग्णांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबीरावरून पाप-पुण्याच्या गोष्टी केल्या. परंतु, हे घोडे आपली ताकद किती, आपली झेप किती याचा विचार न करताच आमदार जगताप यांच्या पराभवाची दिवास्वप्ने पाहत आहेत, हे राजकीय वास्तव आहे. पिंपरी-चिंचवडमधील जनता विरोधकांना किती साथ देईल, याबद्दल शंकाच आहे.