आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव वर प्रभाग फेररचनेचा सर्वात मोठा परिणाम

0
564

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचना नकाशात चिखली, चऱ्होली, इंद्रायणीनगर, सॅन्डविक कॉलनी, प्रेमलोक पार्क, घरकुल, बिजलीनगर आदी प्रभागांतून थोडेफर फेरबदल आहेत. चऱ्होली प्रभागातील सुमारे ५००० मतदार शेजारील सॅन्डविक कॉलनी प्रभागाला जोडल्याचा मोठा परिणाम वगळता बाकी सर्व किरकोळ आहेत. चऱ्होली प्रभागात पूर्वी अनुसुचित जमातीसाठी १ जागा राखीव होती ती आता प्रभाग क्रमांक पिंपळे गुरव ४४ मध्ये आली आहे.

प्रभाग नकाशातील फेरबदलात प्रभाग क्रमांक २ बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी मध्ये कुदळवाडी लगतचा काही परिसर प्रभाग क्रमांक १२ ला जोडला आहे. त्यामुळे चिखली प्रभाग क्रमांक २ मधील १ जागा अनुसुचित जातीसाठी राखीव होणार आहे. पूर्व ३ ही जागा खुल्या होत्या. आता या बदलामुळे एक जागा राखीव होणार आहे. आबा मोरे, जितू यादव, साधना मळेकर, विकास साने या प्रमुख इच्छुकांपैकी एक दोघांना घरी बसावे लागेल. एक जागा राखीव झाल्याने बहुतांश दिग्गज समोरासमोर येणार आहेत. ज्यांनी यापूर्वीच आपापसात पॅनल तयार केले होते, त्यानाही खीळ बसली आहे. भाजपाचे कुंदन गायकवाड यांना यापूर्वी संधी नव्हती, आता आरक्षण पडल्याने त्यांना संधी मिळणार आहे.

प्रभाग क्रमांक ३ बोराडेवाडी – जाधववाडी मधील प्राधिकरणातील सेक्टर ४ चा काही भाग जोडला होता. आता तो वगळण्यात आला आणि प्रभाग क्रमांक ११ इंद्रायणीनगर ला जोडला आहे. सुमारे हजार लोकसंख्येचा भाग जोडला आहे. त्याचा फारसा परिणाम संभवत नाही. भाजपामधून राष्ट्रवादीत आलेल्या वसंत बोराटे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांचा तसेच माजी महापौर राहुल जाधव यांचा हा प्रभाग आहे.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये चऱ्होली-दिघी प्रभागात सर्वात मोठा फेरबदल आहे. दिघी परिसरातील आदर्शनगरचा सुमारे ५००० लोकसंख्येचा भाग वगळून तो शेजारील प्रभाग क्रमांक ७ सॅन्डविक कॉलनीला जोडला आहे. पूर्वी जी रचना जाहीर केली होती त्यात या प्रभागात एक जागा अनुसुचित जमातीसाठी (एसटी) राखीव होती म्हणून स्थानिक पातळीवरची राजकिय समिकरणे अडचणीची झाली होती. आता एसटी वगळल्याने तीनही जागा खुल्या झाल्या आहेत. याच प्रभागाबद्दल सर्वाधीक हरकती आल्या होत्या. आख्खा दिघी परिसर वगळण्याची मागणी त्यात केली होती पण तसे झालेले नाही. माजी महापौर नितीन काळजे, माजी नगरसेविका विनया तापकीर आणि भाजपाच्या प्रदेश खजिनदार शैला मोळक यांना मोठी संधी निर्माण झाली आहे.

प्रभाग क्रमांक ७ सॅन्डव्हिक कॉलनी, रामनगर मध्ये शेजारच्या चऱ्होली प्रभागातील ५००० लोकसंख्या जोडल्यामुळे हा सर्वात मोठा प्रभाग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा हा प्रभाग आहे.

प्रभाग क्रमांक ११ इंद्रायणीनगर, बालाजीनगर हा जेष्ठ नगरसेविका स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सिमा सावळे यांचा प्रभाग आहे. त्यात किरकोळ फेरबदल केला असल्याने विशेष परिणाम संभवत नाही.

प्रभाग क्रमांक १२ घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती हा अगदी नविनच प्रभाग आहे.
चिंचवडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक २६ बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगर हा प्रेमलोक पार्क जोडला आहे. पुर्वी तो प्रभाग क्रमांक २७ चिंचवडगावाला जोडलेला होता. सुमारे २५०० मतदारांचा हा भाग जोडल्याने प्रभाग सलग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसवेक भोऊसाहेब भोईर यांचा हा प्रभाग आहे.

प्रभाग क्रमांक ४४ पिंपळे गुरव मध्ये पुन्हा एसटी साठी एक जागा राखीव झाली आहे. चऱ्होली प्रभागातून वगळलेली एसटी ची जागा जोडल्याने १ एससी, १ एसटी अशा दोन जागा राखीव झाल्याने फक्त १ जागा खुली राहणार आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसवेक राजेंद्र जगताप यांच्यासह आमदार लक्ष्मण जगताप यांचे धाकटे बंधू शंकर जगताप तसेच शशिकांत कदम, मेहश जगताप हे आता समोरा समोर येण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक ३३ – रहाटणी मधील १ जागा एससी निघाल्याने तीनही जागा खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे आता नाना काटे, बापू काटे या दिग्गजांसाठी या जागा सोयिच्या झाल्या आहेत