आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते खासदार बारणेंचा रोपटे भेट देऊन सत्कार  

0
970

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – मावळचे नवनिर्वाचित शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मोरवाडी येथील भाजपच्या शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बारणे यांना रोपटे भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी खासदार अमर साबळे, प्राधिकारणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपच्या प्रदेश सदस्या उमा खापरे, महेश कुलकर्णी, राजेश पिल्ले, अमित गोरखे, शहर सरचिटणीस अमोल थोरात, संजय मंगोडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार जगताप यांनी खासदार  बारणे दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले. बारणे यांचा झालेला विजय हा पंतप्रधान मोदी यांचा विजय आहे. मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत  भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळेच मावळमध्ये बारणे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी खासदार बारणे यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली.

खासदार बारणे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने माझे मनापासून काम केले. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच मावळमध्ये माझा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. आता भाजपला मदत करण्याची माझी वेळ आली आहे. यापुढील विधानसभा, महापालिका निवडणुका युती म्हणून एकत्र लढविल्या जातील. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण मदत आणि ताकद देणार असल्याचे बारणे यांनी यावेळी सांगितले.