आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण

0
566

 

पुणे, दि. ७ (पीसीबी) : दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. राहुल कुल यांचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आमदारही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.  कुल यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली. “डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझी कोरोना टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. सुदैवाने माझ्या संपर्कात असलेले माझे कुटुंबीय, कार्यालयातील सहकारी यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून योग्य उपचार सुरु आहेत” असे सांगत कुल यांनी समर्थकांना काळजी न करण्याचे आवाहन केले.

संचारबंदी दरम्यान स्थानिक प्रशासनाशी समन्वय, कोरोना संदर्भात विविध उपाययोजनांसाठी बैठका आणि नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करताना अनेकांशी संपर्क येत होता. जरी योग्य ती काळजी घेत असलो, तरीही कोरोना संक्रमणाचा धोका होताच. परंतु दौंड तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य पार पाडताना, लोकांच्या समस्या सोडवताना हे क्रमप्राप्त होते” असे राहुल कुल यांनी लिहिले आहे.

“पुढील उपचारांसाठी मी विलगीकरणात जरी असलो, तरी माझे दैनंदिन काम नित्यनेमाने सुरु असेल. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत” असे म्हणत लवकरच जनतेच्या सेवेत पुन्हा दाखल होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राहुल कुल याआधी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते आमदारपदी निवडून आले. त्यांच्या पत्नी स्मिता कुल यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.