Pune

आमदार योगेश टिळेकर विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीच्या निषेधार्थ मनसेचा मोर्चा

By PCB Author

October 19, 2018

पुणे, दि. १९ (पीसीबी) – भाजपचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी अचानक बदली करण्यात आली होती. यावर आज (शुक्रवार) गायकवाड यांच्या बदलीच्या निषेधार्थ मनसेने कोंढवा पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढला.

आमदार योगेश टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मगितल्याप्रकरणी मागील आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांची पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत बदली करण्यात आली. भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे बदली झाली असल्याचा आरोप करीत आज पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीच्या निषेधार्थ मनसेचा कोंढवा पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढण्यात आला.या मूक मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या दरम्यान, आमदार टिळेकर आणि त्यांच्या भावावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्याऐवजी कर्तव्यदक्ष अधिकारी असलेल्या मिलिंद गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. हा भारतीय जनता पक्षाचा कुठला पारदर्शी कारभार आहे. आमदार योगेश टिळेकर यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो पूर्ण चौकशीअंती झाला आहे. त्याचे सर्व पुरावे पोलिसांकडे आहेत. असे असताना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. ही निषेधार्थ बाब असून शासनाचा सरकारी यंत्रणेवर विश्वास नाही काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, ही बदली राजकीय दबावामुळे झाली असावी अशी चर्चा पोलीस दलात आणि पुणे शहरात सुरू झाली होती. तर कोंढवा पोलीस स्थानकात आपल्या सहकाऱ्यांचा निरोप घेत असताना पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. याचा व्हिडियो कॅमेरात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.