Maharashtra

आमदार मालोजीराजे यांची विफाच्या उपाध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड

By PCB Author

August 24, 2019

कोल्हापूर, दि. २४ (पीसीबी) – आमदार मालोजीराजे यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (विफा) उपाध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झाली. तसेच कार्यकारिणी समितीवर माणिक मंडलिक यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल केएसएचे पेट्रन चीफ श्रीमंत शाहू छत्रपती यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मालोजीराजे हे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष असून माणिक मंडलिक हे सचिव आहेत.

नागपूर येथे झालेल्या ‘विफा’च्या ७० व्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची फेरिनवड करण्यात आली. तसेच पाच उपाध्यक्ष, तीन सहसचिव, एक कोषाध्यक्ष आणि १३ कार्यकारिणी सदस्यांची निवड झाली. या सभेसाठी कोल्हापूरचे प्रतिनिधी म्हणून मालोजीराजे, माणिक मंडलिक आणि राजेंद्र दळवी उपस्थित होते. मालोजीराजे यांच्यासह आमदार विश्वजीत कदम यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड झाली.

निवड प्रक्रियेनंतर झालेल्या अध्यक्षीय भाषणात पटेल यांनी कोल्हापूरचे कौतुक केले. राज्यात स्वत:चे मैदान असणारा कोल्हापूर हा एकमेव जिल्हा असून याठिकाणी फुटबॉल खेळाला राजाश्रय आणि लोकाश्रय मिळाला आहे. फुटबॉलच्या विकासाबद्दल केएसएकडून सातत्याने नवीन प्रयोग राबवले जात असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.