आमदार महेश लांडगेंचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे राष्ट्रवादीच्या प्रचारात; अमोल कोल्हेंसोबतचा फोटो व्हायरल

0
1092

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत राजकीय खिचडी झाली आहे. निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती झाल्याने आणि काँग्रेस व राष्ट्रवादीचे पूर्वीपासून पटत नसल्यामुळे कोण कोणाचा प्रचार करेल याचा काही नेम राहिलेला नाही. मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांची भेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर कार्यकर्ते, महापालिका निवडणुकीतील भाजपचे उमेदवार व माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे हे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचार करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.

मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आहेत. युतीच्या जागा वाटपात दोन्ही मतदारसंघ शिवसेनेलाच मिळाले आहेत. दोनपैकी एक तरी मतदारसंघ भाजपकडे घेण्याची पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी होती. विशेषतः मावळ लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत ताकद लावली. परंतु, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नमते घेत मावळ मतदारसंघ शिवसेनेलाच देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पक्ष पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे शिरूर मतदारसंघातही शिवसेना आणि भाजपचे फारसे पटत नाही, हे वास्तव आहे. हे वास्तव स्वीकारून भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना उमेदवारांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत.

दुसरीकडे मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये देखील आजपर्यंत फारसे सख्य नव्हते. राष्ट्रवादीने कायम काँग्रेसला संपवण्याचेच काम केले. आज त्याच राष्ट्रवादीला काँग्रेसची नितांत गरज आहे. लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी असून, मावळ आणि शिरूर हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले आहेत. या राजकीय वास्तवतेच्या पार्श्वभूमीवर मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात कोण कोणाचे काम करेल याचा काही नेम राहिलेला नाही. शिवसेना आणि भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेचे काम करत असल्याचे चित्र आहे.

शिवसेनेचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांची त्यांच्या पिंपळेनिलख येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे मावळमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार मनापासून करते की नाही याबाबत संभ्रमावस्था निश्चितपणे निर्माण झालेली आहे. आता शिरूर मतदारसंघातही असेच चित्र पाहायला मिळत आहे. चिखली-तळवडे परिसरातील माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे हे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचार करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. सुरेश म्हेत्रे हे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार होते.

त्याचप्रमाणे म्हेत्रे हे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सुरेश म्हेत्रे यांच्या भावाची सून स्वीनल म्हेत्रे या भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहे. त्यामुळे सुरेश म्हेत्रे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचार करणे हा राजकीय चर्चेचा विषय झाला आहे. मावळ आणि शिरूरमधील या सर्व राजकीय घडामोडी पाहिल्यास दोन्ही मतदारसंघातील निवडणूक म्हणजे राजकीय खिचडी झाल्याचे स्पष्ट होते. कोण कोणाचा प्रचार करेल याचा काही नेम राहिला नसल्यामुळे दोन्ही मतदारसंघातील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार मात्र गॅसवर आहेत. आता मतदान आणि लागणाऱ्या निकालानंतर कोण कोणाचे काम केले आणि त्याचे मतात रुपांतर कसे झाले हे स्पष्ट होणार आहे.