Maharashtra

आमदार प्रकाश गजभिये संभाजी भिडेंच्या वेशभुषेत; आंबे वाटप करून अटकेची मागणी

By PCB Author

July 04, 2018

नागपूर, दि. ४ (पीसीबी) – राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (बुधवार)  सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी संभाजी भिडेगुरूजी यांच्या वेशभुषेत विधान भवनात प्रवेश केला. त्याची ही वेशभूषा परिसरात चर्चेचा विषय ठरली.

आमदार गजभिये हे संभाजी भिडे यांच्या वेशभूषेत विधिमंडळात आले होते. संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी गजभिये यांनी ही वेशभूषा केली होती. निषेध म्हणून त्यांनी विधिमंडळाच्या परिसरात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आंब्यांचे वाटप करण्यात आले.

गजभिये यांच्या हातात आंब्याची टोपली होती. टोपलीतील प्रत्येक आंब्यावर संभाजी भिडे यांच्या शेतातील आंबे असा उल्लेख करण्‍यात आला आहे. यावेळी आमदार गजभिये यांनी भिडेंच्या अटकेची मागणी केली. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.