आमदार अब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी; विखे-पाटलांबाबत लवकरच निर्णय – अशोक चव्हाण  

0
391

जालना, दि. २० (पीसीबी) – पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्याप्रकरणी औरंगाबादमधील काँग्रेसचे   आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जालन्यात दिली. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असे सूचक  विधानही  चव्हाणांनी केले.

जालन्यातील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार विलास औताडे यांची प्रचारसभा भोकरदनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाणांनी ही माहिती दिली. विखे हे अहमदनगरमधील महायुतीचे उमेदवार सुजय विखेंचा प्रचार करत असल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली होती. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार आणि शिवसेना बंडखोर हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरला होता. मात्र दिलजमाई झाल्यानंतर सत्तार यांनी अर्ज मागे घेतला. मध्यंतरी रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटले होते.