Maharashtra

आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं..

By PCB Author

May 12, 2022

औरंगाबाद, दि. १२ (पीसीबी) : एमआयएमचे तेलंगणामधील आमदार अकबरुद्दीन ओवैसी सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं आहे. त्यांच्यासोबत यावेळी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणावरुन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी इशारा दिल्याने आता नव्याने वादळ निर्माण होऊ शकते

एमआयएमचे तेलंगणामधील आमदार अकबरुद्दीन ओवैसी सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याची सुरूवात त्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेऊन केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, वारिस पठाण हेही उपस्थित होते. त्यांच्या या दर्शनानंतर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. “खुल्ताबादमध्ये खूप मोठेमोठे दर्गे आहेत. त्यांना मोठा इतिहास लाभलेला आहे. तिथे कुणीही गेलं तर त्या कबरीचं दर्शन घेतं त्यामुळे त्यामध्ये वेगळा अर्थ काढू नये.” असं जलील बोलताना म्हणाले. आता सगळे रंग आमचे झाले आहेत असंही ते म्हणाले आहेत.

याप्रकरणी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, “औरंगजेबाने प्रजेला खूप त्रास दिला आहे. त्याने हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. खुल्ताबादच्या औरंगजेबाच्या कबरीवर कुणी जात नाही पण हे लोकं राजकारण करण्यासाठी तिथे गेले आहेत. आता काय होते पहा, आम्ही सोडणार नाही.” असा आरोप खैरे यांनी केला आहे.