आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि साथीदारांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल

0
1268

गोळीबार करणाऱ्या विरोधातही खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवारी (दि. 12) दुपारी गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेच्या आदल्या दिवशी (मंगळवार, दि. 11 मे) आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे याने त्याच्या साथीदारांसोबत एका ठेकेदाराच्या कार्यालयात घुसून काही जणांवर प्राणघातक हल्ला केला. तर गोळीबार घडण्यापूर्वी बुधवारी (दि. 12) सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांनी संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझरचे अपहरण करून त्याला काळभोरनगर येथे आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही प्रकरणांमध्ये खुनाच्या प्रयत्नाचे पिंपरी आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आमदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझर विरोधात देखील खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना पहिली –

मंगळवारी (दि. 12) दुपारी साडेबारा वाजता एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड मुंबई या ठेकेदार कंपनीच्या आकुर्डी येथील कार्यालयात आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे, त्यांचे पीए आणि इतर आठजण दोन कार आणि दुचाकीवरून आले. कंपनीच्या पॅन्ट्रीमध्ये जबरदस्तीने घुसून धनराज बोडसे, अमोल कुचेकर यांना हाताने मारहाण केली.

त्यानंतर ऑफिसच्या समोरच्या बाजूला येऊन बेकायदेशीर जमाव जमवून ‘कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहे’ अशी विचारणा केली. तानाजी पवार यांच्याबाबत माहिती नसल्याचे ऑफिसमधील लोकांनी सांगितले असता ऑफिसमधील आयटी एक्झिक्युटिव्ह विनोदकुमार रेड्डी यांना लोखंडी टॉमी सारख्या शस्त्राने डोक्यात मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच कामगार गोकर्ण चव्हाण याला ढकलून देऊन जखमी केले. त्यानंतर एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड या कंपनीचे ऑफिस जबरदस्तीने बंद करण्यासाठी सांगून तानाजी पवार यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरील प्रकरणाबाबत स्वाती सचिन कदम (वय 39) यांनी निगडी पोलीस ठाण्यात सिद्धार्थ बनसोडे, त्यांचे पीए आणि इतर आठजणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

घटना दुसरी –

त्यानंतर एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड कंपनीचे सुपरवायझर तानाजी भगवान पवार (वय 39, रा. मोशी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नाबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान आणि त्यांचे 10 ते 15 साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तानाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 11 मे रोजी आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणात तानाजी पवार आमदार बनसोडे यांना उलटे बोलले असल्याचा समज आरोपींचा झाला. त्यातून 12 मे रोजी सकाळी 11 वाजता तानाजी पवार यांचे हेडगेवार भवन, आकुर्डी येथील त्यांच्या ऑफिसमधून बनसोडे यांच्या दोन साथीदारांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण केले.

तानाजी पवार यांचे अपहरण करून त्यांना काळभोरनगर येथील एका कंपनीच्या कार्यालयात आणण्यात आले. तिथे आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान आणि त्यांचे 10 ते 15 साथीदारांनी पवार यांना हाताने, लथाबुक्क्यांनी, चामडी पट्टयाने, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. सिद्धार्थ बनसोडे याने लोखंडी चॉपरने डोक्यात मारून पवार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

घटना तिसरी –

या प्रकरणातील तिसऱ्या घटनेत सावनकुमार रमेश सलादल्लू (वय 48, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तानाजी भगवान पवार (वय 39, रा. मोशी), संकेत शशिकांत जगताप, श्रीनिवास बिरादार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावनकुमार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी पवार काम करत असलेल्या कंपनीला पिंपरी चिंचवड महापालिकेचे कचरा उचलण्याचे काम मिळाले आहे. त्या कंपनीत स्थानिक तरुणांना नोकरीस प्राधान्य द्यावे यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी चर्चेसाठी पवार याला बोलावले. पवार त्याच्या दोन साथीदारांसोबत आला. चर्चेदरम्यान शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी देऊन आमदार बनसोडे, त्यांचा मुलगा आणि कार्यकर्त्यांच्या दिशेने गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

वरील तिन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस करीत आहेत. दरम्यान आमदार बनसोडे आणि तानाजी पवार यांच्यातील फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक अंगांनी शहरात चर्चा सुरू आहेत.