Maharashtra

आमदारकीचा राजीनामा मंजूर करण्यासाठी हर्षवर्धन जाधवांची वृत्तपत्रात जाहिरात  

By PCB Author

November 17, 2018

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची जाहिरात मराठी वृत्तपत्रात दिली आहे. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना उद्देशून ही राजीनाम्याची जाहिरात असून शिवराज्य बहुजन पक्षाच्या बॅनरखाली ती देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास राजीनामा देण्याचा इशारा हर्षवर्धन जाधव दिला होता. त्यानंतर २५ जुलै रोजी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे आपला राजीनामा पाठवला होता.

मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आंदोलन नको, आता १ डिसेंबरला जल्लोष करा, असे म्हटले होते. या विधानावरही हर्षवर्धन जाधव यांनी टीका केली आहे. केवळ राजकीय टायमिंग साधण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा वेठीस धरला जात असल्याचा आरोपही  जाहिरातीत  करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाबाबत स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नका. मराठा समाजाला न्याय देण्याचे कर्तव्य तुमच्या हातात होते, त्यात तुम्ही दिरंगाई केली. त्यामुळे बरीच कोवळी मुले आत्महत्येकडे वळली. या कारणांमुळे मी माझा राजीनामा कायम ठेवत आहे. धनगर आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा शब्दही तुम्ही पाळला नाही. त्यामुळे तुमच्या विधानसभेच्या जंत्रीमध्ये मी सहभागी होऊ शकत नाही.  त्यामुळे माझा राजीनामा त्वरित मंजूर करावा, अशी जाहीर विनंती करतो, असे आमदार जाधव यांनी म्हटले आहे.