आमच्या संयमाचा अंत झाल्यास जिहादची घोषणा करु; पाकच्या राष्ट्रपतींची भारताला धमकी

0
524

इस्लामाबाद, दि. १४ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरकडून विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून सातत्याने भारताला इशारे देण्याचा उद्योग सुरु आहे. अशाच प्रकारे बुधवारी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी भारताला जिहादची धमकी दिली आहे.

पाकिस्तानच्या या धमक्यांवरुन तिथे कशा प्रकारे खळबळ माजली आहे हे स्पष्ट होते कारण ते आपला स्वातंत्र्यदिनही आनंदाने साजरा करु शकत नाहीत. अल्वी यांनी स्वांतत्र्यदिनी पाकिस्तानला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले की, “तसेही पाकिस्तानला युद्ध नको आहे मात्र, जर भारताने युद्ध छेडले तर पाकिस्तानकडे युद्धानेच उत्तर देण्याचा आणि जिहाद पुकारण्याशिवाय कोणताही पर्याय नसेल.”

अल्वी पुढे म्हणाले, “आज संपूर्ण जग पाहत आहे की पाकिस्तान काश्मीरच्या लोकांसोबत उभा आहे आणि त्यांना कायमच साथ देण्यास तयार आहे. पाकिस्तान काश्मीरींची मदत करणे थांबवणार नाही. पाकिस्तान या प्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतपर्यंत जाईल. भारताने जम्मू-काश्मीरबाबत अशा प्रकारचा निर्णय घेऊन संयुक्त राष्ट्रांच्या नियामांचे उल्लंघन केले आहे.” तसेच भारताने शिमला कराराचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यातील हास्यास्पद बाब म्हणजे याच शिमला कराराची खुद्द पाकिस्ताननेच कधी पर्वा केलेली नाही.