“आमच्या खात्यात जमा झालेले पैसे परत घ्या, कष्टकरी स्त्रीयांचे जिल्हाधिकारी कचेरीवर आगळे आंदोलन”

0
288

पुणे दि. 29 (पीसीबी) – आमची मागणी मान्य करा,अमुक योजना लागू करा,तमुकसाठी आर्थिक सहाय्य मिळालेच पाहिजे इ. मागण्या आणि त्यासाठी होणारी आंदोलने जिल्हाधिकारी कार्यालयाला नवी नाहीत. शासनाचे प्रतिनिधी असणार्‍या जिल्हाधिकार्‍यांकडे रोज अनेक गार्हाणी मांडली जातात. पण आज मोलमजुरी, घरकाम करणार्‍या कष्टकरी स्त्रीयांनी केलेल्या आंदोलनाने जिल्हाधिकारी कचेरीतील अधिकारीही चकित झाले. ज्यांच्याकडे गमवण्यासारखे काहीच न्हवते अशा या कष्टकरी स्त्रीयांनी आज जिल्हाधिकारी कचेरीवर प्रातिनिधिक निदर्शने केली. ती काही मागण्यासाठी न्हवती. तर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या खात्यावर नुकतेच जमा केलेले रु.पंधरा हजार परत घ्या. अशी त्यांची मागणी होती. देहविक्री करणार्‍या स्त्रियांच्या सहाय्य योजनेतील फसवणुकीने जमा केलेले हे पैसे आमचे नाहीत. ते परत घ्या. ज्याचे त्याला द्या. आणि हे कारस्थान रचणार्‍यांचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करा अशी या स्त्रीयांची मागणी होती.

करोनाने गांजलेल्या,टाळेबंदीने पीडलेल्या व रोजगार सुटलेल्या सध्याच्या अवस्थेत स्वयंसेवी संस्थेच्या म्हणवणाऱ्या तीन महिलांनी हडपसर भागातील घरकामगार ,मोलकरीण, कष्टकरी महिलांना गाठले. त्यांनी सांगीतले की केंद्र सरकारच्या योजनेतून घरकामगार/मोलकरीण यांना प्रत्येकी रु १५ हजाराची मदत करणार आहोत. त्यासाठी तुमचे आधारकार्ड, फोटो, रेशनकार्ड व बँकेचे पासबुक द्या. काही दिवसातच रु.१५,००० जमा होतील त्यातील निम्मे आम्हाला परत करावे लागतील. टाळेबंदीमुळे झालेली हलाखीची परिस्थिति त्यात सरकार व संस्थांकडून कष्टकरी घटकांना सहाय्य देण्याची मिळणारी आश्वासने कानावर येत असतात. त्यामुळे संस्थेच्या महिलांनी दिलेले आश्वासन त्यांना स्वाभाविकपणे खरे भासले. या महिला दलित त्यामुळे अल्पशिक्षित, निरक्षर असल्याने त्यांनीही आपली वरील कागदपत्रे विश्वासाने संस्थेच्या महिलांच्या हवाली केली आणि हाताचे अंगठेही दिले. आणि खरोखरीच नुकतेच 23 एप्रिल 2021ला यापैकी काही महिलांच्या खात्यावर रु.१५००० जमा झालेही. त्यानंतर संस्थेच्या महिला व इतर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे रु. ७५०० मागण्यास सुरुवात केली. काही जणींनी त्यांना रु. ७५००दिलेही. दरम्यानच्या काळात एका दैनिकात आलेली एक बातमी वस्तीतील महिलांच्या कुटुंबियांच्या वाचनात आली. त्यात शरीरविक्री व्यवसायात असणाऱ्या महिलांना पुणे जिल्हाधिकारी यांनी प्रत्येकी रु १५,००० त्यांच्या खात्यावर जमा केल्याचा उल्लेख होता. वस्तीतील महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मोबाईलवर आलेल्या मेसेजमध्येही जिल्हाधिकारी,पुणे यांच्याकडून है पैसे जमा झाल्याचा मजकूर आहे. त्यामुळे या प्रकाराचा उलगडा होवून शरीर विक्री करणाऱ्या स्त्रियांच्या योजनेचे पैसे शरीर विक्री न करता इतर कष्टाची कामे करणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा झाल्याची कष्टकरी महिलांची खात्री झाली.

झालेल्या फसवणुकीने संतप्त होवून सामाजिक कार्यकर्ते नितिन पवार व अखिल भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक नीलेश वाघमारे यांना आपली कैफियत ऐकवली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि नेतृत्वाखाली आपला आत्मसन्मान टिकविण्यासाठी आज त्यांनी जिल्हाधिकारी कचेरीवर निदर्शने केली. अप्पर जिल्हादंडाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांची भेट घेवून त्यांना झाल्या प्रकाराबद्दल निवेदन दिले. त्यात शरीर विक्री करणाऱ्या भगिनींविषयी पूर्वग्रह न बाळगताही, सहानुभती ठेवत असताना या मार्गाने उदरनिर्वाह करणे कष्टकरी स्त्रियांना योग्य वाटत नाही. तसेच त्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्या स्त्रीयांच्या यादीत लाभासाठीही असेल नाव येणे हे आमचा आत्मसन्मान पायदळी तुडविण्यासारखे आहे. म्हणून जमा झालेले हे पैसे आम्ही कष्टकरी महिला पैसे काढण्याच्या स्लिपद्वारे आपल्याला परत करत आहेत. त्याचा स्विकार करावा तसेच या महिलांच्या योजनेतील त्यांची नावे लाभार्थी योजनेतून कमी करावीत. कसलीही शहानिशा न करता दिले जात असलेल्या या अनुदानाची व अश्या फसवणुकीची मुळातून चौकशी करावी. दोषींना कडक शासन करावे अशी मागणी केली.

त्यावर हा प्रकार फार गंभीर आहे. याविषयी प्रशासन चौकशी करेल. असे स्पष्ट करत अप्पर जिल्हा दंडाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे खाते तपशील आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला दिले. त्यात हे पैसे परत करण्याची सोय उपलब्ध करून दिली. तसेच ज्यांचे पैसे जमा होतील त्यांच्या प्राप्त तपशीलानुसार लाभार्थ्यांच्या यादीतून त्यांची नावे कमी केली जातील. यावेळी शरीर विक्री करणार्‍या स्त्रियांमध्ये काम करणार्‍या सहेली संस्थेच्या संचालक तेजस्वीनी सेवेकरी यांनाही आमंत्रित करण्यात आले. होते. त्यांनी कष्टकरी महिलांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. आणि शरीर विक्री करणाऱ्या महिलांमध्ये काम करणार्‍या खर्‍या प्रतिनिधींचा समावेश असलेली सत्यशोधन समिती तात्काळ स्थापन करून चौकशी आणि कारवाई करावी. असे त्या म्हणाल्या. या प्रकाराची चौकशी करून कारवाईची मागणी करणारे निवेदन पोलिस उपयुक्त परिमंडल क्र. 5 नम्रता पाटील व वानवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनाही देण्यात आले.