Maharashtra

आमच्या उध्दवला सांभाळा ! याचा अर्थ आता समजला; उध्दव ठाकरेंच्या टीकेला रोहित पवारांचे उत्तर

By PCB Author

October 29, 2018

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते. आमच्या उध्दवला सांभाळा!  त्या सांभाळाचा अर्थ काल समजला, त्याचा अर्थ आमचा मुलगा अल्लड आहे. त्याला सांभाळून घ्या,  असाच असावा. इतका लेख लिहीण्याऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता, तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व बारामती जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यामातून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना प्रत्युत्तर  दिले आहे.

जालन्यातील २४ ऑक्टोंबररोजी एका सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अयोध्येत राममंदिर बांधण्याविषयीच्या उध्दव ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केली होती. ज्यांना पाच वर्षांमध्ये बापाचे स्मारक बांधता आले नाही,ते राम मंदिर काय बांधणार ? असा खोचक सवाल अजित पवार यांनी केला होता. दरम्यान या विधानाचा शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेतला होता.

यावर रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बाळासाहेब हुशार होते. भाषेवर प्रभुत्व असणारे मोठे नेते होते.  मार्मिक असोकी, सामना त्यांनी टीकादेखील जहाल केली. मात्र, त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गरळ ओकून  त्यांच्याच लेखणीचा अपमान केला.  उध्दव ठाकरे कधी लोकांच्यातून निवडडून आले नाहीत की, मातोश्रीच्या बाहेर पडून उभा महाराष्ट्र पाहण्याचे साधे कधी कष्ट घेतले नाही.  महाराष्ट्र दळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होऊन सर्वसामान्यांना भुलवण्याचे काम करत आहेत.

दरम्यान, अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही.  काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या मुतऱ्या थोबाडाने बोलत असतात, अशा शब्दांत या अग्रलेखात हल्ला चढवण्यात आला होता.