Maharashtra

आमची लढत वंचितसोबतच! विरोधीपक्ष नेता वंचित बहुजन आघाडीचाच होईल- देवेंद्र फडणवीस

By PCB Author

August 31, 2019

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीत आमची लढत वंचित बहुजन आघाडीसोबतच आहे. निवडणुकीनंतर विरोधीपक्ष नेताही वंचित बहुजन आघाडीचाच होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये केले. नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार हे मोठे नेते असून त्यांच्याबाबत मी काही वक्तव्य करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. अलिकडच्या दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीतले अनेकजण शरद पवार यांची साथ सोडून भाजपात येत आहेत. तेव्हा पवारांनी काळाची पावले ओळखली पाहिजेत असेही ते म्हटले.

नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील पाच वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांची माहिती दिली. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने तीन लाख घरांना मंजुरी दिली आहे. यामध्ये जवळपास सव्वा लाख घरे महाराष्ट्रासाठी आहेत असंही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युतीबाबत प्रश्न विचारला असता, विधानसभा निवडणुकीत आमची युती आहे आणि शंभर टक्के युती राहणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नारायण राणे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांचा पक्ष भाजपात विलीन करायचा की नाही याचा निर्णय आम्ही शिवसेनेची चर्चेनंतर घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे अशी टीका विरोधक करत होते याबाबत प्रश्न विचारला असता आता वंचित टीम ए आणि काँग्रेस बी टीम झाल्याचे लोकसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे. त्याचमुळे आमचा खरा संघर्ष वंचित बहुजन आघाडीसोबत असणार आहे आणि विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष नेता वंचित बहुजन आघाडीचा असेल असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये बोलताना व्यक्त केला.