“आपल्या माता-भगिनींकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे”

0
413

महाराष्ट्र,दि.९(पीसीबी) – “महिलांसाठी असा कडक कायदा आणणार आहोत ज्यामुळे आपल्या माता-भगिनींकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही,” असं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. कर्जत जामखेडमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

महिलांवरील अत्याचारासंदर्भात कडक कायदा आणला जात असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तक्रार आल्यास पोलिसांनी कारवाई करावी असं सांगताना अजित पवार यांनी हे सरकार कोणाच्या दडपशाहीने चालणार नाही. कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही असं आश्वासन दिलं.

“महिलांवरील अत्याचारासंदर्भात कायदा आणला जात आहे. राज्यात जर एखाद्या महिलेची कोणती तक्रार असेल तर त्याची नोंद जिल्हाप्रमुख, पोलिसांनी घरातील काम समजून त्यात लक्ष घातलं पाहिजे,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. अजित पवारांनी यावेळी महिलांना विधानसभा आणि लोकसभेला आरक्षण द्यावं अशी आमची भूमिका असल्याचं सांगताना पण यावर देशात सगळ्याचं एकमत झालं पाहिजे असं सांगितलं.

दरम्यान, “पोलिसांचीही अनेक कामं हातात घेतली आहेत. १४ कोटींच्या गाड्या पोलिसांसाठी शहर आणि ग्रामीण भागात असतील. पोलिसांना पायाभूत सुविधा देण्याचं काम आम्ही करु. पण पोलिसांनीदेखील कायदा-सुव्यवस्थेकडे पूर्ण लक्ष देत सुरक्षा दिली पाहिजे,” असं अजित पवारांनी म्हटलं.