Maharashtra

‘आपल्या देशात ऑक्सिजनचा तुटवडा असताना बांगलादेशाला द्यायची काय गरज होती…??’

By PCB Author

April 22, 2021

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – राज्यात गंभीर होत चाललेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे. नाशिकमधल्या दुर्घटनेमुळे ऑक्सिजनच्या तुटवड्याचं गांभीर्य अधिक प्रकर्षाने जाणवू लागलेलं असताना आता या मुद्द्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार आणि महाराष्ट्रात सत्ताधारी विरुद्ध भाजपा यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्यावरून भाजपाकडून टीका आणि आक्षेप घेतले जात असताना आता सत्ताधाऱ्यांकडून देखील राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे. “ऑक्सिजनचा आपल्याकडे तुटवडा असताना बांगलादेशला ऑक्सिजन द्यायची काय गरज होती?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता राज्यात राजकारण रंगताना दिसू लागलं आहे.

ऑक्सिजनबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील जितेंद्र आव्हाडांनी यावेळी निशाणा साधला. “राज्यातल्या मुद्द्यांवर केंद्राशी बोललो, तर पंतप्रधान बंगालच्या निवडणुकांमध्ये बिझी असल्याचं सांगण्यात आलं. पीपीई किट, व्हेंटिलेटर देखील केंद्राने महाराष्ट्राला कमी दिले. ऑक्सिजनचा देखील कमी पुरवठा केला जात आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला सुनावलं आहे”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.