Pune

आपल्याविषयी स्तुती नको, भाषण आवरा; शरद पवारांच्या भाषणकर्त्याला सुचना     

By PCB Author

August 25, 2018

बारामती, दि. २५ (पीसीबी) – बारामतीत एका कार्यक्रमात आपल्याविषयी, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी पक्षाविषयी गुणगाण गाणाऱ्या वक्त्याला स्तुती नको, भाषण आवरा,  असे सांगण्याची वेळ खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचे पाल्ह्याळ आणि  विसंगत भाषण ऐकून शरद पवारांनी डोक्याला हात लावला. आणि  भाषण आवरण्याच्या सूचना दिल्या.

बारामतीत वयोश्री योजनेअंतर्गत कृत्रिम अवयवदान आणि इतर साहित्याचे वितरण करण्यात आले. मात्र, यावेळी आपल्या मनोगतात ज्येष्ठ नागरिकांनी योजनेविषयी न बोलता थेट शरद पवार आणि राष्ट्रवादीचे गुणगाण गाण्यास सुरुवात केली. त्यावेळी व्यासपीठावर  उपस्थित असणाऱ्या शरद पवारांनी डोक्याला हात लावला. आणि त्यांना  मनोगत थांबवण्याच्या सूचना केल्या. या कार्यक्रमाला  खासदार सुप्रिया सुळे,  केंद्रीय राज्यमंत्री कृष्षपाल गुर्जर उपस्थित होते.

यावेळी लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना  वयोश्री योजनेबाबत मनोगत व्यक्त करण्यास सांगितले होते.  यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना  या योजनेच्या लाभाऐवजी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस विषयी गोडवे गाण्यास सुरूवात केली.

साहेब मी तुमचाच कार्यकर्ता आहे, साहेब या देशाचे पंतप्रधान व्हावेत, साहेब तुम्हाला १०१ वर्षाचे आयुष्य लाभो,  साहेबांनी कोंबड्यापासून जनावरांपर्यंत सगळे काही दिले, असे गुणगाण गाण्यास सुरूवात केली. यावर शरद पवारांनी डोक्यावर हात ठेवत त्या नागरिकांस तात्काळ भाषण थांबण्याची विनंती केली.  याप्रकरानंतर सभागृहात एकच हशा पिकला.