आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?; राष्ट्रवादीची भाजपविरोधात बॅनरबाजी

0
758

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – “ज्यांना आम्ही नाकारले,  हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले, गोंजारले, आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?”,  अशा आशयाचे बॅनर लावून राष्ट्रवादीने भाजपला  टोला लगावला आहे.  रणजितसिंह मोहिते- पाटील , सुजय विखे- पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत भाजपविरोधात बॅनर लावून नाराज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेशावरून  टीकास्त्र सोडले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांचे पूत्र सुजय विखे यांनी  भाजप प्रवेश केला. त्यापाठोपाठ   रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला.  रणजितसिंह मोहिते- पाटील यांना माढ्यातून उमेदवारी देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिला होता.

या पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईत भाजपविरोधात पोस्टरबाजी  करून निशाणा साधला आहे.   मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लावलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. “ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले,गोंजारले. आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?” अशी झोंबणारी  टीका केली आहे.