आपला पराभव होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते – राजू शेट्टी

0
495

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले असून यामधील सर्वात जास्त आश्चर्यकारक आणि अनपेक्षित निकाल म्हणजे राजू शेट्टींचा पराभव. मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच राजू शेट्टी यांचा विजय नक्की मानला जात होता. मात्र शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा दणदणीत पराभव केला. एक लाखाच्या मताधिक्याने धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव करत विजय मिळवला. दरम्यान राजू शेट्टी यांनी पराभव होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकांना माझ्यापेक्षा चांगला खसादार हवा असे वाटले असेल तर तो निर्णय स्विकारला पाहिजे असे सांगत राजू शेट्टी यांनी मतदारांचा कौल मान्य केला. यापुढे शेतकरी चळवळीत वेगळ्या पद्धतीने काम करत राहीन असेही त्यांनी सांगितले. आधी दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांची बाजू मांडायचो. पण आता रस्त्यावरची लढाई करत किंवा अन्य मार्गाने शेतकऱ्यांसाठी काम करु असे राजू शेट्टींनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदींविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे पराभव झाला का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘नरेंद्र मोदींविरोधात भूमिका घेतली होती. घेतली नसती तर अंतर्मनाने साथ दिली नसती. त्यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या होत्या. यासाठी मोदी सरकारने घेतलेले शेतकऱ्यांचे धोरण जबाबदार आहे. सरकराला शेतकऱ्यांसाठी काही देणे घेणे नाही. म्हणून मी विरोधी भूमिका घेतली. याच प्रश्नावर सरकार निरुत्तर होत होते. यामुळे मी विरोधात घेतलेली भूमिका त्यांच्या नेत्यांना हे रुचले नसावे’.