Maharashtra

आपत्तीग्रस्तांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; केलं पॅकेज जाहीर

By PCB Author

October 23, 2020

मुंबई,दि.२३(पीसीबी) – अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. दिवाळीपर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

परतीच्या पावसामुळं राज्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी व विरोधकांनीही गेल्या काही दिवसांत बांधावर जाऊन शेतकऱ्यांची ही परिस्थिती जाणून घेतली. ही परिस्थिती गंभीर असल्याचं सर्वांनीच मान्य केलं होतं. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेऊन त्यात १० हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान ‘परिस्थिती कठीण आहे. राज्य सरकारपुढेही अनेक आर्थिक अडचणी आहेत. केंद्र सरकारकडून येणे असलेले ३८ हजार कोटी अजूनही मिळालेले नाहीत. अद्यापही पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे. त्यांच्याकडून मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. पण राज्य सरकार शेतकऱ्यांवर संकट येऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे. सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असू नये हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.