Maharashtra

आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत का? प्रश्न विचारत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By PCB Author

April 12, 2020

 

मुंबई, दि.१२ (पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विधानपरिषदेवर नियुक्ती सदस्य करण्यावरुन आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. आता चंद्रकांत पाटलांनी पाटलांवर पलटवार करत प्रश्न उपस्थित केला आहे.

बोलताना पाटिल म्हणाले,जयंतराव, कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा. त्यांना त्याची गरज सगळ्यात जास्त असल्याचे चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे.

भाजपचे हजारो कार्यकर्ते आज राज्यभर जीव तोडून मदत कार्य करत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ५६० कम्युनिटी किचन्स चालवली जात आहेत. ४३ लाख कुटुंबांना जेवण किंवा शिधा पुरवला जात आहे. ६.५० लाखांपेक्षा जास्त मास्क आणि ४.७५ लाख सॅनिटायझरचे वाटप केले असल्याचे पाटलांनी सांगितले.

कोरोनाविरुद्धची लढाई लढायचे सोडून हा ठराव करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक का बोलवावी लागली हा माझा प्रश्न होता. आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत का?, असा प्रश्न करत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.