‘आनंद पसरवा, अफवा नाही’; फेक पोस्ट रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपची वर्तमानपत्रात जाहिरात

0
483

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) –  व्हॉट्सअॅपवर  अफवा पसरवणाऱ्या पोस्ट, फोटो, व्हिडीओ व्हायरल  करण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आज (सोमवार) व्हॉट्सअॅपकडून वर्तमानपत्रात जाहिरात देऊन पोस्ट फेक आहे, हे कसे ओळखायचे याची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच आनंद पसरवा, अफवा नाही, असा संदेशही या जाहिरातीमधून दिला आहे.

भारतात २० कोटी व्हॉट्सअॅप वापरकर्ते  करून पोस्टची सत्यता न पडताळता पोस्ट व्हायरल करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. व्हॉट्सअॅपच्या फेक पोस्टमुळे जातीय दंगली सारख्या घटना घडल्या आहेत. नुकतेच गोवर-रुबेला लसीमुळे नपुंसकत्व येत असल्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे अशा फेक पोस्ट रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपने पाऊल उचलले आहे.

व्हॉट्सअॅपवरील फॉरवर्डेड मेसेज ओळखण्यासाठी पोस्टवरील उजव्या बाजूला एक चिन्ह देण्यात आले आहे. ते चिन्ह जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे बातमी खरी आहे की खोटी, हे ओळखण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, ज्या संदेशाचे मुळ स्त्रोत माहीत नसते, ज्यांचा पुरावा नसतो, असे फॉरवर्डेड मेसेजेस ज्यामुळे तुम्हाला संताप येतो, असे फोटो, व्हिडीओ, इतकेच नाही तर व्हॉईस रेकॉर्डिंगसुद्धा एडिट करुन तुमची दिशाभूल केली जाऊ शकते, असे जाहिरातीत म्हटले आहे.

सत्य जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सर्च करा आणि बातम्यांच्या विश्वसनीय साईट्सवरुन ही बातमी कुठून आली आहे, याचा शोध घ्या. तरी देखील शंका असेल तर सत्य शोधणाऱ्या वेबसाईट्स, विश्वासपात्र व्यक्ती किंवा लीडर्सकडून अधिक माहिती मिळवा, असे आवाहन या जाहिरातीमध्ये करण्यात आले आहे.